Remdesivir Injection : प्रदेश भाजप राज्य सरकारला ५० हजार रेमडेसिविर देणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2021 01:26 IST2021-04-13T01:25:59+5:302021-04-13T01:26:42+5:30
Remdesivir Injection: विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि प्रदेश भाजपचे उपाध्यक्ष आ. प्रसाद लाड यांनी सोमवारी दमणमधील ब्रुक फार्मा कंपनीच्या व्यवस्थापनाशी चर्चा केली.

Remdesivir Injection : प्रदेश भाजप राज्य सरकारला ५० हजार रेमडेसिविर देणार
मुंबई : प्रदेश भाजपतर्फे राज्य सरकारला ५० हजार रेमडेसिविर इंजेक्शन्स भेट देण्यात येतील. राज्यात या इंजेक्शनचा तुटवडा असताना विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने भाजपने राज्य शासनाला मदतीचा हात पुढे केला आहे.
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि प्रदेश भाजपचे उपाध्यक्ष आ. प्रसाद लाड यांनी सोमवारी दमणमधील ब्रुक फार्मा कंपनीच्या व्यवस्थापनाशी चर्चा केली. त्यानंतर ५० हजार रेमडेसिविर खरेदी करण्याचे ठरले. दमणमधून ही इंजेक्शन्स आणण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची परवानगी लागते. ती मंगळवारपर्यंत मिळणार आहे, असे लाड यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
सरकार पत्र देणार
दरेकर यांनी दमणमधूनच राज्याचे अन्न व औषधी प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्याशी चर्चा केली. दमणमधून ही इंजेक्शन्स महाराष्ट्रात आणण्यासाठी आवश्यक पत्र दिले जाईल, असे आश्वासन शिंगणे यांनी आम्हाला दिले आहे, असे दरेकर यांनी सांगितले.
पावणेपाच कोटी खर्च
दमणमधून इंजेक्शन्सचा साठा आल्यानंतर तो फडणवीस यांच्या हस्ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द करण्यात येणार असल्याचे लाड यांनी स्पष्ट केले. ९५० रुपये प्रत्येकी याप्रमाणे ५० हजार इंजेक्शनसाठी ४ कोटी ७५ लाख रुपयांचा खर्च प्रदेश भाजपने केला आहे.