रिलायन्स जिओचे बनावट बिल पाठवल्या प्रकरणी गुन्हा
By Admin | Updated: February 10, 2017 19:45 IST2017-02-10T19:45:16+5:302017-02-10T19:45:16+5:30
रिलायन्स जिओच्या नावाने बनावट बिल तयार करून ते ग्राहकाला पाठवल्या प्रकरणी गुन्हा दाखल

रिलायन्स जिओचे बनावट बिल पाठवल्या प्रकरणी गुन्हा
>ऑनलाइन लोकमत
नांदेड, दि. 10 - रिलायन्स जिओच्या नावाने बनावट बिल तयार करून ते ग्राहकाला पाठवल्या प्रकरणी एका अज्ञात व्यक्तिविरुद्ध कंपनीने नांदेड येथील विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. संपूर्ण भारतामध्ये रिलायन्स जिओची 4जी सेवा 31 मार्च 2017 पर्यंत मोफत असून कंपनीची बदनामी करून ग्राहकांच्या मनात संभ्रम निर्माण करण्याच्या हेतूने हा प्रकार जाणूनबुजून केल्याचे प्रथमदर्शनी सिद्ध झाले आहे.
नांदेड येथील रहिवासी श्री शेख उमर मन्नान यांच्या लेटर बॉक्स मध्ये रु. 29102 .00 रुपयाचे संबंधित बनावट बिल आढळून आले असता त्यांनी रिलायन्स जिओ च्या नांदेड येथिल कार्यालयात हि बाब निदर्शनास आणून दिली. कंपनीचा लोगो तसेच इतर माहिती वापरून बनावट बिल तयार केल्याचे लक्षात येताच कंपनीच्या वतीने अज्ञात व्यक्तिविरुद्ध गुन्हा दाखल केला गेला.
रिलायन्स जिओ तर्फे कोणत्याही ग्राहकाला कोणत्याही प्रकारचे बिल पाठवले नसून ग्राहकांनी संबंधित कृत्यांवर आणि सोशल मीडिया वर दिशाभूल करणाऱ्या पोस्टवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन कंपनीच्या वतीने करण्यात आले. ग्राहकांच्या मनात संभ्रम निर्माण करून कंपनीचे नुकसान करण्याचा प्रयत्न काही व्यक्ती हेतुपुरस्पर करत असून कंपनी संबंधित व्यक्ती आणि प्रवृत्तीविरुद्ध कडक कारवाई करणार असल्याचे यावेळी कंपनीच्या प्रवक्त्यांनी सांगितले. 31 मार्च 2017 पर्यंत जिओची सेवा पूर्णपणे मोफत असून त्यासाठी कोणत्याही प्रकारचा दर आकारला जाणार नसून ग्राहकांनी घाबरून जाऊ नये तसेच सदर कृत्य कंपनीच्या निदर्शनास आणून देण्याचे यावेळी कंपनीच्या वतीने सांगण्यात आले.