राज्यात काल अनेक भागांमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली असून जनजीवन विस्कळीत झाले. मुंबई, ठाणे, पालघर, कल्याण- डोंबिवली, भिवंडी आणि नाशिक या ठिकाणी पावसाचा जोर पाहायला मिळाला असून काही भागांत पाणी साचल्याने वाहतुकीवर परिणाम झाल्याचे दिसून आले. याच पार्श्वभूमीवर हवामान विभागाने पालघर जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी केला. हवामान विभागाच्या इशाऱ्यानंतर जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे.
पालघरच्या जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ अन्वये जारी केलेल्या आदेशात असे म्हटले आहे की, हवामान विभागाने पालघर जिल्ह्यात सोमवारी अतिमुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून सर्व अंगणवाडी, जिल्हा परिषद शाळा, नगरपालिका शाळा, खाजगी आणि अनुदानित शाळा, आश्रमशाळा, महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर केली. परंतु, शाळा आणि महाविद्यालयांतील मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन वेळेत हजर राहावे तसेच स्थानिक प्रशासनाच्या सूचनेनुसार आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित जबाबदाऱ्या पार पाडाव्यात, असेही आदेशात म्हटले आहे.