पावसाचा ‘विद्रोह’; आजही बरसणार, राज्याचा बहुतांश भागांना अवकाळीचा तडाखा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2021 06:58 IST2021-12-02T06:57:57+5:302021-12-02T06:58:28+5:30
Rain in Maharashtra: आग्नेय अरबी समुद्र व लगतच्या लक्षद्वीप बेट समूह ते उत्तर किनारपट्टी यादरम्यान कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने बुधवारी संपूर्ण कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी जोरदार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला.

पावसाचा ‘विद्रोह’; आजही बरसणार, राज्याचा बहुतांश भागांना अवकाळीचा तडाखा
मुंबई/नाशिक/पुणे : आग्नेय अरबी समुद्र व लगतच्या लक्षद्वीप बेट समूह ते उत्तर किनारपट्टी यादरम्यान कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने बुधवारी संपूर्ण कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी जोरदार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. कांद्यासह आंबा, द्राक्षे, काजू आदी फळपिकांना याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. येत्या दोन दिवसांत आणखी पावसाची शक्यता आहे. दरम्यान, नाशिकमध्ये होणाऱ्या साहित्य संमेलनावरही या पावसाचे सावट आहे.
चक्रीवादळाचा धोका
थायलंडमध्ये निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र बंगालचा उपसागर व अंदमान समुद्रात आले असून, त्याचे चक्रीवादळात रूपांतर होऊन ते ४ डिसेंबरला आंध्रच्या किनारपट्टीलगत धडकण्याची शक्यता आहे.
येथे पडणार पाऊस
२ डिसेंबर : कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात सर्वदूर
३ डिसेंबर : रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह. अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, औरंगाबाद, बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा. विदर्भातही तुरळक ठिकाणी बरसणार
बुरशीनाशक फवारावे
हा अवकाळी पाऊस ज्वारी व गहू या पिकांसाठी उपयुक्त आहे. काजू, द्राक्षे व आंब्याला बुरशीजन्य रोगांची लागण होण्याची शक्यता असून, तज्ज्ञांच्या सल्ल्याने शेतकऱ्यांनी पिकांवर बुरशीनाशकांची फवारणी करावी, असे आवाहन कृषी खात्याने शेतकऱ्यांना केले आहे.