Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 19:08 IST2025-07-01T19:02:03+5:302025-07-01T19:08:11+5:30

Ravindra Chavan BJP State President: देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू अशी ओळख, वरळीतील कार्यक्रमात रवींद्र चव्हाणांचे नाव जाहीर

Ravindra Chavan elected unopposed as BJP Maharashtra state president in mumbai event devendra fadnavis | Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड

Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड

Ravindra Chavan BJP State President: महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही वर्षात प्रचंड मुसंडी मारलेल्या भाजपा पक्षाने आज आपला नवा 'कॅप्टन' निवडला. आगामी मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज, मंगळवारी भाजपाला नवीन प्रदेशाध्यक्ष मिळाला. देवेंद्र फडणवीसांचे विश्वासू आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मर्जीतील असलेले रवींद्र चव्हाण यांच्या नावाची आज अधिकृत घोषणा करण्यात आली. वरळी येथे झालेल्या जंगी कार्यक्रमात रवींद्र चव्हाणांचे नाव जाहीर करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांच्यासह प्रमुख भाजप नेते उपस्थित होते.

पक्षाच्या राज्य परिषदेचे अधिवेशन मंगळवारी मुंबईतील वरळीत सुरु झाले. प्रदेशाध्यक्ष पदासाठी रवींद्र चव्हाण यांचा एकट्याचाच अर्ज आला होता. त्यामुळे राज्य भाजपाच्या प्रदेशाध्यक्षपदी त्यांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला होता.आज रवींद्र चव्हाण यांनी मावळते अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून सूत्रे स्वीकारली. प्रदेशाध्यक्ष पदाच्या निवडीसाठी केंद्रीय भाजपने केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांना पाठविले होते. रिजिजू यांच्या उपस्थितीत सोमवारी प्रदेश कार्यालयात निवडीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष बावनकुळे, मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री पंकजा मुंडे, शिवेंद्रसिंहराजे भोसले, अशोक उईके, माजी प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार आदी उपस्थित होते.

कोकणात भाजपच्या विस्तारामध्ये रवींद्र चव्हाण यांचा मोलाचा वाटा आहे. ते केवळ कोकणपुरतेच मर्यादित नाहीत. तर पक्षाचे प्रदेश सरचिटणीस, कार्याध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले आहे. त्यांच्या नेतृत्वगुणांचा अनुभव आता प्रदेशाध्यक्ष म्हणून येईल. रवींद्र चव्हाण हे चौथ्यांदा डोंबिवली मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेलेले आहेत. ते आधी देवेंद्र फडणवीस यांच्या पहिल्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री, तर एकनाथ शिंदे सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक ते भाजपचे प्रदेशाध्यक्ष असा त्यांचा प्रवास राहिला आहे.

Web Title: Ravindra Chavan elected unopposed as BJP Maharashtra state president in mumbai event devendra fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.