मुंबई : राज्य भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला आहे. या पदासाठी त्यांचा एकट्याचाच अर्ज आला. पक्षाच्या राज्य परिषदेचे अधिवेशन मंगळवारी मुंबईत होत असून, त्यात चव्हाण हे मावळते अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून सूत्रे स्वीकारतील.
प्रदेशाध्यक्ष पदाच्या निवडीसाठी केंद्रीय भाजपने केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांना पाठविले होते. रिजिजू यांच्या उपस्थितीत सोमवारी प्रदेश कार्यालयात निवडीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष बावनकुळे, मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री पंकजा मुंडे, शिवेंद्रसिंहराजे भोसले, अशोक उईके, माजी प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार आदी उपस्थित होते.
फडणवीस यांनी यावेळी पत्रकारांना सांगितले की, बावनकुळे यांनी केलेल्या पक्ष बांधणीमुळेच विधानसभा निवडणुकीत पक्षाला मोठे यश मिळाले.
कोकणात भाजपच्या विस्तारामध्ये रवींद्र चव्हाण यांचा मोलाचा वाटा आहे. अर्थात ते केवळ कोकणपुरते मर्यादित नाहीत. पक्षाचे प्रदेश सरचिटणीस, कार्याध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले आहे. त्यांच्या नेतृत्वगुणांचा अनुभव आता प्रदेशाध्यक्ष म्हणून येईलच.
रवींद्र चव्हाण हे चौथ्यांदा डोंबिवली मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेलेले आहेत. ते आधी देवेंद्र फडणवीस यांच्या पहिल्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री, तर एकनाथ शिंदे सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक ते भाजपचे प्रदेशाध्यक्ष असा त्यांचा प्रवास राहिला आहे.