राष्ट्रसंत मोरारी बापू यांना राज्य सरकारकडून अतिथी दर्जा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2025 10:48 IST2025-09-06T10:47:19+5:302025-09-06T10:48:16+5:30
मुख्यमंत्री फडणवीस यांचे डॉ. विजय दर्डा यांनी मानले आभार; आजपासून यवतमाळ येथे भव्य रामकथा यज्ञाला प्रारंभ

राष्ट्रसंत मोरारी बापू यांना राज्य सरकारकडून अतिथी दर्जा!
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : श्रवणीय रामकथेसाठी यवतमाळ येथे येत असलेले जगविख्यात आध्यात्मिक गुरू, कथावाचक, राष्ट्रसंत मोरारी बापू यांना स्टेट गेस्ट अर्थात राज्य अतिथीचा दर्जा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. शनिवारी (६ सप्टेंबर) यवतमाळ येथे हा रामकथा यज्ञ सुरू होत असून तो १४ सप्टेंबरपर्यंत चालणार आहे.
लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन व राज्यसभेचे माजी खासदार डॉ. विजय दर्डा यांनी संत मोरारी बापू यांना राज्य अतिथी दर्जा देण्याची विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. मुख्यमंत्र्यांनी ती मान्य केली असून तसा आदेश काढण्यात आला आहे. त्या अन्वये, राज्यशिष्टाचारानुसार मोरारी बापू यांना त्यांचे नागपूर विमानतळावर आगमन, वर्धा मार्गे यवतमाळ प्रवास आणि यवतमाळ येथील वास्तव्य तसेच यवतमाळ ते वर्धा मार्गे नागपूर या परतीच्या प्रवासात सरकारच्या वतीने योग्य तो सन्मान दिला जाईल. यात पोलिसांकडून मानवंदना, पायलट व एस्कॉर्ट सुविधा आणि रामकथास्थळी बंदोबस्त आदींचा समावेश आहे.
आपली विनंती मान्य करून राष्ट्रसंत मोरारी बापू यांना राज्य अतिथी दर्जा दिल्याबद्दल डॉ. विजय दर्डा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच राज्य सरकारचे आभार मानले आहेत. भारतीय संस्कृतीमधील अध्यात्म तसेच प्रेम, सत्य व करूणा आदी तत्त्वांचा जगभर प्रसार करणारे प्रमुख कथाकार असा अठ्ठ्याहत्तर वर्षीय राष्ट्रसंत मोरारी बापू यांचा लौकिक असून त्यांच्या रसाळ रामकथेचे आयोजन बऱ्याच काळानंतर विदर्भात होत आहे. दर्डा परिवारातर्फे या रामकथेचे आयोजन यवतमाळमध्ये दारव्हा मार्गावरील चिंतामणी कृषी उत्पन्न बाजार समिती यार्डात ६ ते १४ सप्टेंबर या कालावधीत करण्यात आले. धार्मिक व उत्साही वातावरणात शनिवारी सायंकाळी चार वाजता या रामकथेला प्रारंभ होत आहे.