Mumbai: मुंबईत पाहायला मिळणार दुर्मीळ पक्षी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2025 16:07 IST2025-08-31T16:04:23+5:302025-08-31T16:07:20+5:30
अखेर मुलुंड पक्षी उद्यानाला मुहूर्त; महापालिकेकडून निविदा प्रक्रिया सुरू, १६६ कोटी खर्च करणार

Mumbai: मुंबईत पाहायला मिळणार दुर्मीळ पक्षी!
मुंबई : मुंबई महापालिकेतर्फे मुलुंड येथे लवकरच पक्षीगृह उभारण्यात येणार आहे. या ठिकाणी १८ दुर्मीळ प्रजातींसह २०६ विविध प्रजातींचे पक्षी ठेवण्यात येणार असून, या कामासाठी १६६ कोटी असून, रुपये खर्च अंदाजित महानगरपालिका प्रशासनाने निविदा प्रक्रियेला सुरुवात केली आहे.
भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले प्राणी आणि वनस्पती संग्रहालयात जुना पक्षी विभाग आहे. येथे देश-परदेशातील विविध प्रजातींच्या पक्ष्यांचा विहार असतो. याच्या जोडीला आता मुलुंड पश्चिम येथील नाहूर गाव परिसरात सर्व सुविधांनीयुक्त असे उद्यान तयार करण्यात येणार आहे.
या उद्यानात पक्षीगृह तयार करण्यात येणार आहे. हे प्रस्तावित पक्षी उद्यान १७,९५८ चौरस मीटर भूखंडावर बांधण्यात येणार असून, ते भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणीसंग्रहालयाचे उपकेंद्र असणार आहे. हे काम पूर्ण होण्यास दोन वर्षांचा कालावधी लागणार आहे.
उद्यानामध्ये असणार तरी काय ?
पक्षी उद्यानात प्रशस्त आणि नैसर्गिक निवारे असतील. पक्षांसाठी नैसर्गिक अधिवास तयार करण्यात येणार आहेत. पक्षीगृहात प्रवेश करण्यापूर्वी मोठ्या धबधब्यासह आणि प्रवाहासह पर्यटकांचे स्वागत करण्यासाठी खुले प्लाझादेखील असणार आहे.
खर्च वाढल्याचा दावा
नाहूर पक्षी उद्यान प्रकल्पाचा खर्च अवघ्या चार महिन्यांत तब्बल ६६ कोटींनी वाढल्याचा दावा वॉचडॉग फाउंडेशनने केला असून, तीव्र आक्षेप घेतला आहे. मूळ १०० कोटींच्या अंदाजापेक्षा वाढून आता १६६ कोटी रुपयांचा टेंडर जाहीर केला असून, हा सार्वजनिक पैशांचा सरळसरळ अपव्यय असल्याचा आरोप फाउंडेशनने केला. या पार्श्वभूमीवर फाउंडेशनकडून तातडीने महालेखापरीक्षक व लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशीची मागणी केली आहे तसेच सध्याचा टेंडर त्वरित रद्द करण्याची मागणीही केली.
२०६ प्रजातींचे पक्षी
पक्षी उद्यानात आशियाई, आफ्रिकी, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका अशी पक्ष्यांची क्षेत्रवार विभागणी असणार आहे. प्रत्येक पक्ष्यांच्या प्रजातींचे निवासस्थान उभारण्यात येणार आहे. रेड ब्रेस्टेड पॅराकीट, ब्लॉसम हेडेड पॅराकीट, व्हाईट पीकॉक, मलबार ग्रे हॉर्नबिल, ब्लॅक हंस, ब्लॅक मुनिया, कोकाटू गालाह, ओस्ट्रिचेस, स्कॉलेट, स्कॉलेट, स्कॉलेट या काळाच्या ओघात लुप्त होत असलेल्या दुर्मीळ १८ प्रजार्तीचे २०६ पक्षी येथे पाहता येणार आहेत.