मुंबई - महायुती सरकारने राज्यातील शेतकरी, लाडकी बहीण, बेरोजगार यांची घोर फसवणूक केली आहे. शेतकरी संकटात असताना त्यांना भरीव मदत देण्याऐवजी जुन्याच योजनांचे एकत्रीकरण करून फसवे पॅकेज जाहीर केले आहे. शेतकरी कर्जमाफीवरही महायुती सरकार बोलत नाही. लाडकी बहीण योजनेतून २१०० रुपये देण्यावर सरकार गप्प आहे. राज्यातील जनतेच्या प्रश्नावर काँग्रेस पक्ष आंदोलन, मोर्चे काढून सरकारला जाब विचारेल, असे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस, महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी सांगितले.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या पोलिटिकल अफेअर्स कमिटीची बैठक प्रभारी रमेश चेन्नाथला यांच्या प्रमुख उपस्थितीत व प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली टिळक भवन येथे पार पडली. बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना रमेश चेन्नीथला म्हणाले की, लाडकी बहीण योजनेसाठी महायुती सरकारकडे निधी नाही. आदिवासी विकास, सामाजिक न्याय विभागाचा निधी सरकार लाडकी बहीण योजनेसाठी वळवत असून मागासवर्गीय समाजाच्या कल्याणकारी योजनांवर त्याचा परिणाम होत आहे. महिलांच्या मतांवर डोळा ठेवून २१०० रुपये देण्याची घोषणा केली पण १५०० रुपये देतानाही सरकारची दमछाक होत आहे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपोटी हेक्टरी ५० हजार रुपयांची मागणी केली होती पण सरकारने तुटपुंजी मदत दिली आहे. निवडणूक प्रचारावेळी महायुतीने शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आश्वासन दिले होते त्यावरही सरकार काहीच बोलत नाही. हे सरकार शेतकरी विरोधी आहे. बेरोजगारीच्या प्रश्नावरही सरकार लक्ष देत नाही.
चेन्नीथला पुढे म्हणाले की, राज्यातील जनतेच्या महत्वाच्या प्रश्नांकडे महायुती सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असून महाराष्ट्रातील सामाजिक शांतता भंग करण्याचे प्रयत्न सत्ताधारी पक्षातील काही लोक करत आहेत. धार्मिक तेढ निर्माण करून महाराष्ट्रातील सामाजिक सौहार्द भंग करण्याचे षडयंत्र आहे परंतु मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यावर काहीही बोलत नाहीत.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी निवडणुकीत घोटाळा झाल्याचे पुराव्यासह उघड केले पण निवडणूक आयोग त्यावर समाधानकारक उत्तर देत नाही. निवडणुकीतील घोटाळ्याप्रश्नी इतर राजकीय पक्षांनीही तक्रारी केल्या आहेत. याच प्रश्नावर उद्या काँग्रेससह इतर राजकीय पक्षांचे शिष्टमंडळ निवडणूक आयुक्तांना भेटणार आहे. या शिष्टमंडळात काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.) व शिवसेना (उबाठा) पक्षाचे नेते सहभागी होणार आहेत.
राज ठाकरे यांच्याबद्ल विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना चेन्नीथला म्हणाले की, मनसेसंदर्भात काँग्रेस पक्षात कोणताही चर्चा झालेली नाही. मित्रपक्षांशीही यासंदर्भात कोणतीही चर्चा झालेली नाही. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते यांची स्वबळावर लढण्याची इच्छा आहे परंतु आघाडी किंवा युती करण्याचा निर्णय स्थानिक पातळीवर घेण्याचे अधिकार दिले आहेत असे चेन्नीथला यांनी सांगितले.
Web Summary : Ramesh Chennithala accuses the Mahayuti government of deceiving farmers and the unemployed with false promises and repackaged schemes. He criticized the lack of support for farmers, silence on loan waivers, and diversion of funds from welfare programs. Congress will protest against these issues.
Web Summary : रमेश चेन्नीथला ने महायुति सरकार पर झूठे वादों और पुनर्गठित योजनाओं के साथ किसानों और बेरोजगारों को धोखा देने का आरोप लगाया। उन्होंने किसानों के लिए समर्थन की कमी, ऋण माफी पर चुप्पी और कल्याणकारी कार्यक्रमों से धन के मोड़ की आलोचना की। कांग्रेस इन मुद्दों पर विरोध करेगी।