रामदास आठवलेंनी वर्तवले प्रकाश आंबेडकरांच्या पराभवाचे भाकित
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2019 15:52 IST2019-04-10T15:44:37+5:302019-04-10T15:52:01+5:30
भाजपाला आतून मदत करण्याऐवजी थेट मदत केल्यास प्रकाश आंबेडकरांनाही मंत्री होण्याची संधी मिळेल

रामदास आठवलेंनी वर्तवले प्रकाश आंबेडकरांच्या पराभवाचे भाकित
पुणे : ‘‘प्रकाश आंबेडकरांची वंचित आघाडी ही ‘किंचित आघाडी’ आहे. महाराष्ट्राच्या राजकारणावर या आघाडीचा किंचितही परिणाम होणार नाही. या आघाडीचा एकही खासदार निवडून येणार नाही,’’ असे भाकित रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी वर्तवले आहे. वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर सोलापूर आणि अकोला या दोन लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. पण आंबेडकरांसह ‘वंचित’च्या सर्व उमेदवारांच्या पराभवाचा दावा आठवलेंनी केला आहे.
‘‘मी सगळ्या आघाड्या करुन आलो आहे. महाराष्ट्रातली जनता तिसरी आघाडी मान्य करत नाही,’’ असे आठवले म्हणाले. वंचित आघाडीचा फायदा भाजपा-शिवसेनेलाच होणार आहे. भाजपाला आतून मदत करण्याऐवजी थेट मदत केल्यास प्रकाश आंबेडकरांनाही मंत्री होण्याची संधी मिळेल, असेही आठवलेंनी सांगितले. पुण्यातील भाजपा-शिवसेना महायुतीचे उमेदवार गिरीश बापट यांच्या प्रचारासाठी पुण्यात आले असता बुधवारी (दि. १०) आठवले पत्रकारांशी बोलत होते.
‘‘आंबेडकर दोनदा खासदार झाले. परंतु, दोन्हीवेळी ते कॉंग्रेस बरोबर होते. भाजपा-शिवसेना किंवा कॉंग्रेस आघाडीसोबत गेल्याशिवाय महाराष्ट्रात निवडून येत नाही. त्यांच्या सभांना गर्दी झाल्याचे दिसले. माझ्याही पुण्या-ठाण्यातल्या सभा जोरदार झाल्या,’’ असे आठवले म्हणाले. मी सगळ््या आघाड्यांचे प्रयत्न करुन भाजपासोबत आलो आहे. महाराष्ट्रातल्या जनतेला तिसरी आघाडी मान्य होत नाही. जिंकण्याइतकी मते तिसºया आघाडीला मिळू शकत नाहीत.
‘वंचित’चा फायदा भाजपा-शिवसेनेलाच होणार आहे. वंचित बहुजन आघाडीला सत्ता हवी असेल तर त्यांनी आमच्यासोबत यावे, असे आठवले म्हणाले. मनसेच्या राज ठाकरेंच्या सभांना गर्दी जमत असल्याबद्दल टिप्पणी करताना आठवले म्हणाले, की त्यांचे इव्हेंट मॅनेजमेंट मोठे असल्याने सभा चांगल्या होतात. पण या सभांचा फायदा कॉंग्रेस-राष्ट्रवादीला मिळणार नाही.
..................
प्रकाश आंबेडकरांबद्दल प्रेम
‘‘भाजपा आणि शिवसेना यांच्यातले मतभेद टोकाला गेले असतानाही राजकीय परिपक्वता दाखवत देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला. प्रकाश आंबेडकर आणि माझ्यातले वाद टोकाचे नसूनही आमचे वाद मिटत नाहीत. त्यांना माझा तिटकारा का वाटतो हे मला माहिती नाही, पण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वारसदार म्हणून प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल माझ्या मनात प्रेमाची भावना आहे.’’ - रामदास आठवले