’म्हणून राज्यसभेच्या जागेसाठी काँग्रेस इच्छूक, मविआच्या बैठकीत घेतली आग्रही भूमिका’, विजय वडेट्टीवार म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2026 13:47 IST2026-02-26T13:46:35+5:302026-02-26T13:47:16+5:30
Maharashtra Rajya Sabha Election: राज्यसभेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये राज्यातील विरोधी पक्ष असलेल्या महाविकास आघाडीच्या वाट्याला केवळ एक जागा येण्याची शक्यता आहे. ही एकमेव जागा कुणी लढवावी यावरून महाविकास आघाडीमधील घटक पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू आहे.

’म्हणून राज्यसभेच्या जागेसाठी काँग्रेस इच्छूक, मविआच्या बैठकीत घेतली आग्रही भूमिका’, विजय वडेट्टीवार म्हणाले...
मुंबई - राज्यसभेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये राज्यातील विरोधी पक्ष असलेल्या महाविकास आघाडीच्या वाट्याला केवळ एक जागा येण्याची शक्यता आहे. ही एकमेव जागा कुणी लढवावी यावरून महाविकास आघाडीमधील घटक पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. या पार्श्वभूमीवर पार्श्वभूमीवर आज महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत राष्ट्रीय राजकारण लक्षात घेता राज्यसभेची ही जागा काँग्रेसला मिळावी, अशी आग्रही भूमिका काँग्रेसच्या नेत्यांनी घेतली. या बैठकीनंतर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी संवाद साधत महाविकास आघाडीची भूमिका स्पष्ट केली आहे.
काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष असल्याने राष्ट्रीय राजकारणाचा विचार करून राज्यसभेची जागा काँग्रेसला मिळावी, असा प्रस्ताव पक्षाच्या वतीने मांडण्यात आला आहे. बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या दोन्ही पक्षांनी आपली मते मांडली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते यासंदर्भात त्यांच्या पक्षश्रेष्ठींशी चर्चा करतील, तर उद्धवसेनेनेही आपली भूमिका स्पष्ट करतील अस वडेट्टीवार म्हणाले.
राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीतील जागावाटपाचा प्रश्न चर्चेने सुटेल असा विश्वास वडेट्टीवार यांनी व्यक्त केला. आम्ही सर्वजण आपापल्या पक्षश्रेष्ठींशी आणि वरिष्ठ नेत्यांशी पुन्हा चर्चा करू हे वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले. उद्धवसेना आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी जागेसाठी आग्रह धरला असला, तरी महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्रितपणे ही निवडणूक लढवणार आहोत. तिन्ही पक्षांच्या संमतीनेच उमेदवार निश्चित केला जाईल. राज्यसभा अर्जासाठी ५ मार्चपर्यंत वेळ आहे. त्यामुळे मित्रपक्षांशी सन्मानपूर्वक चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाईल. महाविकास आघाडी एकत्र लढली तर आमचा विजय निश्चित आहे, अस काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.
मालेगाव प्रकरणी प्रश्न विचारला असता विजय वडेट्टीवार म्हणाले की, धर्माचे पालन रस्त्यावर होऊ नये, परंतु सध्या रमजानचा महिना सुरू आहे आणि रोजाच्या काळात नमाज वेळेवर अदा करणे आवश्यक असते. या प्रकरणाचा विनाकारण वाद केला जात आहे, हे पूर्णपणे राजकारणाने प्रेरित आहे. समाजाला हिंदू-मुस्लिममध्ये विभागण्याचा प्रयत्न केला जात आहे. जे लोक शंकराचार्यांना देखील सोडत नाहीत, ते कोणत्या विचारधारेचे राजकारण करत आहेत हे जनता ओळखून आहे, असा टोला वडेट्टीवार यांनी लगावला.