उद्धव ठाकरेंची सोडली साथ, शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करताच राजन तेली म्हणाले, "दुर्दैवाने तिथे..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 12:23 IST2025-10-03T12:22:19+5:302025-10-03T12:23:16+5:30
Rajan Teli News: मूळचे कट्टर शिवसैनिक, नंतर भाजप आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केलेल्या राजन तेलींनी पुन्हा पक्षांतर केलं. शिंदेंच्या शिवसेनेत गेल्यानंतर त्यांनी ठाकरेंच्या शिवसेना सोडण्याचे कारण सांगितले.

उद्धव ठाकरेंची सोडली साथ, शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करताच राजन तेली म्हणाले, "दुर्दैवाने तिथे..."
Rajan Teli Uddhav Thackeray: दसऱ्याच्या दिवशीच उद्धव ठाकरेंची साथ सोडत माजी आमदार राजन तेलींनी सीमोल्लंघन गेले. एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत राजन तेलींनी शिवसेनेत प्रवेश केला. मुंबईत झालेल्या या पक्षप्रवेशावेळी तेलींनी ठाकरेंची साथ सोडण्याचे कारणही सांगितले.
गेल्या काही दिवसांपासून राजन तेलींच्या पक्षांतरच्या चर्चा सुरू होत्या. दसऱ्याच्या दिवशी या चर्चा खऱ्या ठरल्या. राजन तेलींनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करत सर्व तर्कविर्तकांना पूर्णविराम दिला. यावेळी त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेतील कार्यपद्धतीबद्दल नाराजी व्यक्त केली.
ठाकरेंची साथ का सोडली? राजन तेली म्हणाले...
माजी आमदार राजन तेली शिवसेना सोडण्याबद्दल म्हणाले, "तिथे संघटना बांधणी करायला संधी नव्हती. आम्ही बऱ्याचदा प्रयत्न केला. एक जिल्हाप्रमुख नेमून सगळ्यांना बरोबर घेऊन बूथ स्तरावर बांधणी करायला हवी, असे आम्ही सांगितले. पण, दुर्दैवाने तिथे ते होत नव्हतं. मग संधीच नसेल, तर आपल्याबरोबरच्या कार्यकर्त्यांना कधीच संधी मिळणार नाही. त्यामुळे हा निर्णय घेतला", अशी भूमिका तेली यांनी मांडली.
"मी कुठलेही पद मागितले नव्हते. पण, खालच्या सगळ्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन काम करायला हवे. मी कुठल्याच पक्षावर नाराज नाही. ती सगळी मंडळी चांगली आहेत. त्यामुळे त्यांच्यावर नाराज असण्याचा प्रश्न नाहीये, मुद्दा इतकाच आहे की, काम करण्याची संधी मिळायला हवी आणि लोकांची कामेही व्हायला हवीत", असे राजन तेली पक्षांतरानंतर म्हणाले.
तेलींचा शब्द, मरेपर्यंत शिवसेनेत राहील
शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर माजी आमदार तेली म्हणाले, "शिवसेनेचा झेंडा हाती घेतला आहे. आता हा झेंडा मरेपर्यंत हातात राहील. मी सुरूवातीपासूनच शिवसैनिक आहे. त्यामुळे नक्कीच इथे चांगलं काम करण्याची संधी मला मिळेल. माझे जुने सहकारी निलेश राणे, उदय सामंत, दीपक केसरकर यांच्याबरोबर चांगलं काम करता येईल", अशी आशा त्यांनी व्यक्त केली.