Raj Thackeray Speech MNS Meeting : सोशल मीडियावर एक जरी पोस्ट गेली, तर...; राज ठाकरेंचा पदाधिकाऱ्यांना सज्जड दम
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2022 14:35 IST2022-08-23T14:13:15+5:302022-08-23T14:35:52+5:30
Raj Thackeray Speech MNS Meeting: निवडणुका दिवाळीनंतर लागतील. कदाचित जानेवारीपर्यंतही लागतील. राज्यात जे काही सुरु आहे, ते विचित्र आहे, असे राज ठाकरे म्हणाले.

Raj Thackeray Speech MNS Meeting : सोशल मीडियावर एक जरी पोस्ट गेली, तर...; राज ठाकरेंचा पदाधिकाऱ्यांना सज्जड दम
माझे बोलणे, माझे विचार, भूमिका लोकापर्यंत पोहोचवा. जर मनसेच्या पदाधिकाऱ्याने किंवा कार्यकर्त्याने पक्षांतर्गत एकमेकांविरोधात सोशल मीडियावर एकजरी पोस्ट केली तर याद राखा, एकालाही पक्षात ठेवणार नाही, असा इशारा राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिला. राज ठाकरे यांचे शस्त्रक्रियेनंतर पहिलेच भाषण होते. राज यांनी काही हलकेफुलके प्रसंगही सांगितले.
निवडणुका दिवाळीनंतर लागतील. कदाचित जानेवारीपर्यंतही लागतील. राज्यात जे काही सुरु आहे, ते विचित्र आहे. महपालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका पुढे ढकलण्यावरून राजकारण सुरु आहे. कोरोनापासून सुरु आहे हे. केव्हाही निवडणुका लागतील. महाराष्ट्रात असे कधीच घडले नव्हते. महाराष्ट्राने एवढे सगळे दिले, शिवराय दिले, कवी, लेखक दिले. महाराष्ट्रात आठ भारतरत्न आहेत. यापैकी चार जण हे एकट्या दापोलीतील आहे. तिकडे जाऊन विचारा त्यांचे काही आहे का? पुतळे उभे करून काही होत नाही. आम्हाला त्याचे काही पडलेलेच नाही, असे राज ठाकरे म्हणाले.
राजकारणात येण्यासाठी मी राज्यातील जनतेला पत्र लिहिणार आहे, असेही राज ठाकरे म्हणाले. आपल्याच महाराष्ट्रात आपल्याच महापुरुषांचे प्रत्येक जात वाभाडे काढत आहे. तुम्हाला वेगवेगळे ठेवायचे आहे. वारसा हा विचारांचा असतो, वास्तूचा नसतो. पेशव्यांच्या हाती संपूर्ण सत्ता होती, पण त्यांनी स्वत:ला कधीही छत्रपती म्हणवून घेतले नाही. आम्ही नोकर, छत्रपती तेच आहेत. आम्ही फक्त विचार पोहोचवतोय, असे सांगत राज ठाकरेंनी मी बाळासाहेबांचे विचार पोहोचवत आहे असे म्हटले. तसेच माझ्याकडे निशानी असली काय नसली काय, पक्ष असला काय नसला काय, मी नशीबवान आहे, असा टोला राज ठाकरे यांनी लगावला.
मनोहर जोशी होते...
मी बाळासाहेबांना बाहेर पडतोय म्हणून सांगायला गेलो, तेव्हा तिथे मनोहर जोशी होते. ते खोलीच्या बाहेर गेले. बाळासाहेबांनी हात पसरले, मला मीठी मारली आणि मला म्हणाले जा. त्यांना समजले होते. मी दगाफटका करून बाहेर पडलो नाही. तुमच्या विश्वासावर बाहेर पडलो. तुमच्या विश्वासावर पक्ष उभा केला. आम्ही जेवढी आंदोलने केलीत, तेवढी कुणीच केली नाहीत आणि यशस्वीही केली नाहीत. माझे भाषण सुरु असताना ठाण्यात खळ्ळकण आवाज आला. त्यानंतर मोबाईल कंपन्यांची पत्रे आली. एका आठवड्याची वेळ दिली, त्यानंतर महाराष्ट्रात मराठीत आवाज ऐकू येऊ लागला, असेही राज ठाकरे म्हणाले.