"राज ठाकरे यांनी या गैरसमजातून बाहेर यायला हवे", भाजपाने राज ठाकरेंना कोणत्या मुद्द्यावरून डिवचले?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2026 12:57 IST2026-02-10T12:53:48+5:302026-02-10T12:57:06+5:30
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या टीका केली. ठाकरेंच्या या टीकेला भाजपाने उत्तर देत डिवचले.

"राज ठाकरे यांनी या गैरसमजातून बाहेर यायला हवे", भाजपाने राज ठाकरेंना कोणत्या मुद्द्यावरून डिवचले?
"मोहनराव भागवतांना एक गोष्ट सांगू इच्छितो की, ती सर्व मंडळी तुमच्या प्रेमाखातर आली नव्हती तर ती नरेंद्र मोदी यांच्या सरकारी भीतीमुळे आली होती", असे म्हणत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावर टीका केली. या टीकेवरून भाजपानेराज ठाकरेंवर पलटवार केला. "संघ शंभर वर्षे वाटचाल करून समाजमान्य झाला, तुमच्यासारखे स्वार्थी राजकीय पक्ष दोनचार दशकांतच संपले. याचा आधी विचार करा!", असा टोला भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी राज ठाकरेंना लगावला.
राज ठाकरे यांनी मुंबईत झालेल्या सरसंघचालकांच्या कार्यक्रमावर आणि मराठी भाषेच्या मुद्द्यावर भाष्य केले. 'भाषेबद्दल आग्रही राहणे, त्यासाठी वेळेस आंदोलन करणे हा एक आजार आहे', या मोहन भागवत यांच्या विधानावर राज ठाकरेंनी बोट ठेवले.
सरकारी भीतीमुळे ते लोक आले होते
राज ठाकरे म्हणाले की, "मोहनराव भागवतांना एक गोष्ट सांगू इच्छितो की, ती सर्व मंडळी तुमच्या प्रेमाखातर आली नव्हती तर ती नरेंद्र मोदी यांच्या सरकारी भीतीमुळे आली होती! नाहीतर आजवर का कोणी या असल्या रटाळ प्रवचनांना आले नाहीत? त्यामुळे ती मंडळी आपल्यासाठी आली होती या गैरसमजातून प्रथम आपण बाहेर या!", असा सल्ला राज ठाकरेंनी दिला.
भाजपाचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर
भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी राज ठाकरेंच्या टीकेला उत्तर देताना म्हटले की, "राज ठाकरे म्हणतात, सरकारी भीतीमुळे मोहन भागवत यांच्या रटाळ कार्यक्रमाला लोक आले."
"राज ठाकरे यांनी या गैरसमजातून बाहेर यायला हवे. ज्या पद्धतीने मनसेच्या खळखट्याकच्या भीतीने लोक येतात, तसंच इतरत्रही होत असावं, असा समज करून घेणं चुकीचं आहे. संघाच्या कार्यक्रमांना लोक शिस्तीने, स्वेच्छेने येतात. संघाच्या शाखा, संचलन आणि बहुतांश कार्यक्रम हे पहाटे किंवा सकाळी होत असतात. त्यामुळे ते आपल्याला दिसत नसतील, इतकंच", अशा शब्दात भाजपाने राज ठाकरेंना डिवचले.
"आपली विश्वासार्हता संपली, संघाला सल्ले देण्याची गरज नाही"
"संघ शंभर वर्षे वाटचाल करून समाजमान्य झाला, तुमच्यासारखे स्वार्थी राजकीय पक्ष दोनचार दशकांतच संपले. याचा आधी विचार करा!", असा सल्लाही भाजपाने राज ठाकरेंना दिला आहे.
"राहिला प्रश्न, मराठी भाषा आणि अस्मितेचा… होय, मराठी भाषा अभिमानाचीच गोष्ट आहे. पण कोणतीही भाषा ही संवादाचं माध्यम असायला हवं, संघर्षाचं नव्हे. मराठीचा आग्रह धरताना इतर भाषांचा द्वेष सुरू झाला, आणि त्या द्वेषातून दोन बळी गेले, तेव्हाच या मुद्द्यावरची आपली विश्वासार्हता संपली. म्हणून संघाला सल्ले देण्याची गरज नाही. संघ संवादाचा आग्रह धरतो, संघर्षाचा नाही", असे उत्तर केशव उपाध्ये यांनी राज ठाकरेंच्या टीकेला दिले.