निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 20:08 IST2025-07-28T20:07:29+5:302025-07-28T20:08:47+5:30
काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी लोकसभेच्या अधिवेशनादरम्यान निशिकांत दुबे यांना घेराव घालत त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली.

निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
राज्यात मराठी भाषेवरून वाद पेटलेला असताना भाजपाचे खासदार निशिकांत दुबे यांनी मराठी माणसाला आपटून आपटून मारू, असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. या वक्तव्यावरून काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी लोकसभेच्या अधिवेशनादरम्यान निशिकांत दुबे यांना घेराव घालत त्यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. याबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वर्षा गायकवाड यांना पत्र लिहून त्यांचे कौतुक केले आहे.
राज ठाकरे यांनी खासदार वर्षा गायकवाड यांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात त्यांचे मनापासून अभिनंदन केले. "मराठी माणसांना आपटून आपटून मारू अशी दर्पोक्ती करणाऱ्या निशिकांत दुबेला तुम्ही संसदेत घेरले आणि त्याला जाब विचारला, त्याबद्दल तुमचे मन:पूर्वक अभिनंदन. महाराष्ट्राचा, मराठी माणसाचा, मराठी भाषेचा अपमान, अन्याय होत असताना संसदेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे खासदार गप्प असतात, असे चित्र मराठी जनतेच्या समोर येत होते. त्याला तुम्ही कृतीने छेद दिलात. तुमचे खरेच मनापासून आभार!"
"महाराष्ट्र सध्या 'व्यापक भूमिका घेण्याच्या' विचारांनी ग्रासलेला आहे, असे चित्र दिसते. मात्र, माझ्या मते हा एक प्रकारचा उगाच ओढवून घेतलेला न्यूनगंड आहे. महाराष्ट्राने नक्कीच देशाच्या हिताचा विचार करावा, कारण देशासाठी विचार करण्याची आणि काही ठोस कृती करण्याची क्षमता असलेल्या मोजक्या राज्यांमध्ये महाराष्ट्र आघाडीवर आहे. आपण मराठी आहोत, मराठी जनतेने आपल्याला निवडून दिले, याची जाणीव आणि या जनतेप्रती व प्रांताप्रती असलेली जबाबदारी सर्वप्रथम असल्याचा विसर पडू लागला आहे. ही एक चिंतेची बाब आहे", अशी खंतही राज ठाकरेंनी व्यक्त केली.