इंडिया आघाडीत राज ठाकरेंच्या मनसेला सहभागी करून घेणार का? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2025 16:11 IST2025-10-16T16:10:05+5:302025-10-16T16:11:09+5:30
Raj Thackeray MNS Mahavikas Aaghadi, Maharashtra Politics: निवडणूक आयोगाकडे गेलेल्या शिष्टमंडळात काँग्रेसचे प्रतिनिधी होते, असेही त्यांनी अधोरेखित केले.

इंडिया आघाडीत राज ठाकरेंच्या मनसेला सहभागी करून घेणार का? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले...
Raj Thackeray MNS Mahavikas Aaghadi, Maharashtra Politics: निवडणुक याद्यांमधील घोळ या मुद्द्यावर विरोध पक्षांचे शिष्टमंडळ निवडणूक आयोगाला भेटायला गेले होते. त्यात राज ठाकरे, उद्धव ठाकरे, शरद पवार गट आणि काँग्रेसचीही नेतेमंडळी होती. त्यामुळे आता मनसे महाविकास आघाडीत सहभागी झाली आहे का, असा सवाल सर्वत्र चर्चिला जात होता. पण तसे अद्याप झाले नसल्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले. तसेच, या मुद्द्यावर नेमकी भूमिका काय, यावरही त्यांनी भाष्य केले.
मनसेच्या महाविकास आघाडीतील समावेशाबद्दल...
"निवडणूक आयोगाकडे गेलेले शिष्टमंडळ हे मतदार याद्यातील घोटाळे व एकूणच निवडणूक प्रक्रियेतील दोष यासंदर्भात होते. यात कोणत्या पक्षाला आघाडी वा युतीत सहभागी करून घेण्याचा मुद्दा नव्हता. मनसेकडून आघाडीविषयी कोणताही प्रस्ताव अद्याप आलेला नाही. त्यामुळे त्यावर भाष्य करणे उचित होणार नाही. इंडिया आघाडीत एखाद्या पक्षाचा सहभाग करायचा असेल, तर त्याचा निर्णय इंडिया आघाडीतील घटक पक्ष घेतील," असे हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्टपणे सांगितले.
निवडणूक याद्यांतील घोळ हा महत्त्वाचा प्रश्न
"निवडणूक प्रक्रियेतील घोळ हा सध्याचा महत्वाचा प्रश्न आहे. निवडणूक आयोगाकडे गेलेल्या शिष्टमंडळात काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते सहभागी होते. मतदारयाद्यातील घोळ, मतचोरी हे विषय महत्वाचे आहेत. काँग्रेस पक्ष सातत्याने या मुद्दयाचा पाठपुरावा करत आहे. निवडणूक आयोगाच्या एकूण कारभारासंदर्भात काही गंभीर प्रश्न उपस्थित झालेले आहेत. यासाठी हे शिष्टमंडळ गेले होते, त्यामुळे कोणी काही तक्रार करण्याचा प्रश्न उद्भवत नाही," असेही त्यांना स्पष्ट केले.
निवडणुकीतील घोटाळ्याचा राहुल गांधींकडून पर्दार्फाश
"निवडणुकीतील घोटाळ्याचा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी पुराव्यासह पर्दाफाश करत आहेत. यात महाराष्ट्रातील कामठी मतदारसंघ व मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघातील घोटाळेही त्यांनी उघड केले आहेत. या घोटाळ्यावर राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.) व शिवसेना (उबाठा) यांना काँग्रेसने माहिती दिलेली आहे. निवडणूक आयोगाच्या भेटीतही बाळासाहेब थोरात यांनी घोटाळ्याची माहिती आयोगाकडे दिलेली आहे", अशी टीकाही हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.