राज ठाकरे सहकुटुंब पोहचले मातोश्रीवर; चर्चा राजकीय? निमित्त स्नेहभोजनाचे, तीन महिन्यात दोघांची सातवी भेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2025 08:54 IST2025-10-13T08:53:33+5:302025-10-13T08:54:40+5:30
तब्बल २० वर्षांनी राज यांच्या आई मातोश्रीवर गेल्या. स्नेहभोजनासाठी ही भेट होती, असे सांगितले जात आहे. मात्र राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था तसेच मुंबईसह इतर महापालिकांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.

राज ठाकरे सहकुटुंब पोहचले मातोश्रीवर; चर्चा राजकीय? निमित्त स्नेहभोजनाचे, तीन महिन्यात दोघांची सातवी भेट
मुंबई : उद्धव सेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या मागील काही दिवसांत वाढलेल्या भेटी या युतीबाबत स्पष्ट संकेत देत आहेत. राज हे रविवारी आईसह सहकुटुंब मातोश्रीवर गेले होते.
तब्बल २० वर्षांनी राज यांच्या आई मातोश्रीवर गेल्या. स्नेहभोजनासाठी ही भेट होती, असे सांगितले जात आहे. मात्र राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था तसेच मुंबईसह इतर महापालिकांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.
यावेळी राज यांनी उद्धव यांना शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा आणि तुळशीचे रोप भेट दिले. मागील तीन महिन्यांत या दोन भावातील ही सातवी भेट आहे. त्याची आता जोरदार चर्चा आहे.
मातोश्रीवर राज आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये पावणे तीन तास चर्चा झाल्याची माहिती आहे. मनसे- उद्धव सेनेतील युतीची चर्चा पुढे गेल्याची शक्यता आहे. शालेय अभ्यासक्रमात पहिल्यापासून हिंदी विषय सक्तीचा करण्याला विरोध करण्याच्या निमित्ताने ते एकत्र आले होते.
मनसेकडून दिवाळीत शिवाजी पार्क येथे दीपोत्सवाचे आयोजन करण्यात येते. त्या कार्यक्रमाला राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना निमंत्रण दिल्याचीही चर्चा आहे.
मातोश्रीवर दोन्ही ठाकरे बंधूंनी सहकुटुंब स्नेहभोजन केले, तसेच त्यांच्या राजकीय विषयावर आणि युतीबाबत चर्चा झाली असण्याची शक्यता आहे.