Rain Live Updates: रत्नागिरी, रायगडमध्ये नौदल, लष्कराच्या तुकड्या दाखल; मदतकार्याला सुरुवात

LIVE

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2021 11:16 AM2021-07-22T11:16:17+5:302021-07-22T22:09:51+5:30

गेल्या काही तासांपासून राज्यात मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी होत आहे. अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून पूरजन्य परिस्थितीही निर्माण ...

Rain Live Updates: Flood situation in many places, even rivers crossed the danger level | Rain Live Updates: रत्नागिरी, रायगडमध्ये नौदल, लष्कराच्या तुकड्या दाखल; मदतकार्याला सुरुवात

Rain Live Updates: रत्नागिरी, रायगडमध्ये नौदल, लष्कराच्या तुकड्या दाखल; मदतकार्याला सुरुवात

Next

गेल्या काही तासांपासून राज्यात मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी होत आहे. अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून पूरजन्य परिस्थितीही निर्माण झाली आहे. काही ठिकाणी नद्या भरून वाहू लागल्या आहेत तर काही ठिकाणी साचलेलं पाणी घरांमध्येही शिरल्याचं दृश्य निर्माण झालं आहे.

LIVE

Get Latest Updates

12:26 AM

एनडीआरएफची चार पथकं चिपळुमध्ये दाखल; खेर्डी येथे २० जणांची सुटका

11:57 PM

सातारा- वाईतील देवरुखवाडीत ५ घरांवर दरड कोसळी; २७ जणांची सुखरुप सुटका

आणखी भूस्खलन होण्याचा धोका असल्यानं, पावसाचा जोरही कायम असल्यानं मदतकार्य थांबवण्यात आलं; २ जण ढिगाऱ्याखाली अडकले असण्याची शक्यता

10:23 PM

मुंबई, ठाणे, रायगड, सातारा, रत्नागिरीत पावसाचा जोर कायम राहणार

रोहा (रायगड), महाबळेश्वर (सातारा), पुणे घाटमाथा, रत्नागिरीचा काही भाग (दापोली) आणि मुंबईसह ठाण्यातील काही परिसरांवर ढगांची गर्दी; अधूनमधून पावसाची शक्यता

10:08 PM

रत्नागिरी, रायगडमध्ये नौदल, लष्कराच्या तुकड्या दाखल; मदतकार्य सुरू

08:10 PM

भिवंडीत मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी पूरस्थिती; शेकडो घरात शिरलं पावसाचं पाणी

भिवंडीत मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी पूरस्थिती; शेकडो घरात शिरलं पावसाचं पाणी; शहरातील दोन हजारांहून अधिक, तर ग्रामीण भागात तीनशेहून अधिक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं

07:22 PM

चंद्रपुरला दिवसभर पावसानं झोडपलं; अनेकांचं मोठं नुकसान

चंद्रपूर : दिवसभर सुरु असलेल्या संततधार पावसामुळे राजुरा शहरालगत असलेल्या भवानी नाल्याला आलेल्या पुराच्या पाण्याने राजुरा व रामपूर परिसरातील बाजारपेठ पाण्याखाली आली असून काही घरात पाणी घुसले आहे. दुकानात पाणी घुसल्याने दुकानदारांची मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे तर घरात पाणी गेल्याने घरातील जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य पाण्याने भिजले आहे. दुपारी ३.३० पासून गडचांदूर-राजुरा मार्ग बंद आहे. या ठिकाणी  नवीन पुलिया बांधण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

06:56 PM

खेडमध्ये रस्त्यावरुन वाहतंय पाणी

05:24 PM

पुराच्या पाण्यात वाहून गेला 'साकव'

राजापूर तालुक्यातील कासारकोळवण येथील साकव पुराच्या पाण्यामुळे वाहून गेला.

04:56 PM

दरड कोसळल्यामुळे सहा रेल्वेगाड्या विस्कळीत

नागपूर : मुसळधार पावसामुळे इगतपुरी ते कसारा दरम्यान दरड कोसळल्यामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली. यामुळे मुंबई-हावडा मार्गावरील सहा रेल्वेगाड्या विस्कळीत झाल्या.

04:48 PM

चिपळूण - पुराचे पाणी गावात शिरले

04:48 PM

चिपळूणमध्ये पुराच्या पाण्यात बुडाली वाहने

04:29 PM

धाडसी युवकांनी पुरातून मार्ग काढत वृद्धेला नेले रुग्णालयात

04:05 PM

लातुरात रिक्षावर झाड कोसळले ; चालक ठार, एक जखमी

लातूर : लातूर शहरात उषाकिरण टॉकीज समोरच्या परिसरात थांबलेला ऑटोरिक्षा क्रमांक एम.एच. २४ ए.बी. ३१६८ वर गुरूवारी दुपारी एक झाड कोसळले. त्यात रिक्षाचालक मारोती सिद्राम काळे रा. चांडेश्वर (वय ४८ )यांचा जागीच मृत्यू झाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून लातूर शहर व परिसरात रिमझिम पाऊस सुरू आहे. दरम्यान हिरवे झाड कसे काय कोसळले याचा शोध घेतला जात आहे. रिक्षात एक जण होता, तोही किरकोळ जखमी आहे. त्याची माहिती पोलिस घेत आहेत.

04:04 PM

मोडक-सागर व तानसा तलाव ओसंडून वाहू लागला

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना विविध नागरी सेवा-सुविधा देणारी आपली बृहन्मुंबई महानगरपालिका दररोज ३८५ कोटी लीटर (३,८५० दशलक्ष लीटर) एवढा पिण्याच्या शुद्ध पाण्याचा पुरवठा नागरिकांना केला जातो. हा पाणीपुरवठा ज्या ७ तलावांमधून केला जातो, त्यापैकी मोडक-सागर तलाव हा आज मध्यरात्री ०३.२४ वाजता, तर तानसा तलाव हा आज पहाटे ०५.४८ वाजता ओसंडून वाहू लागला आहे.

03:34 PM

बदलापूर शहर पुन्हा एकदा पुराच्या विळख्यात

शहरातील उल्हास नदीच्या किनाऱ्यावर असलेल्या रमेश वाडी आणि वालिवली परिसरातील गृहसंकुलाना देखील पुराच्या पाण्याचा फटका सहन करावा लागला. गेल्या ४८ तासात झालेल्या मुसळधार पावसामुळे बदलापूर शहरात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. बदलापूर गावाकडे जाणाऱ्या उल्हास नदीवरील पूल पूर्णपणे पाण्याखाली आला होता. त्यामुळे बदलापूर गावाकडे जाणारा रस्ता बंद करण्यात आला. नदी पात्र पासून दीड किलोमीटर पर्यंत पाणी शहरात गेल्याने अनेक गृहसंकुलातील पहिल्या माळापर्यंत पाणी आले होते. या भागातील चाळी पूर्णपणे पाण्याखाली आल्या होत्या.

03:28 PM

कोल्हापूर जिल्ह्यात २३ जुलैला ‘ऑरेंज अलर्ट, नागरिकांना सावधानतेचा इशारा

भारतीय हवामान वेधशाळेने कोल्हापूर जिल्ह्यासाठी २१ ते २५ जुलै पर्यंत मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता वर्तवली आहे. २२ जुलै करिता ‘रेड’ तर २३ जुलै करिता ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे. जिल्ह्यातील सर्वच डोंगराळ भागामध्ये म्हणजेच चंदगड, आजरा, राधानगरी, शाहुवाडी, पन्हाळा, गगनबावडा व भुदरगड या ठिकाणी २२ जुलैला सकाळी ८ वाजेपर्यंत १५० ते २०० मिमी किंवा त्यापेक्षाही जास्त पाऊस झालेला आहे.

02:58 PM

रेल्वे स्थानकावर अडकलेल्या प्रवाशांसाठी लालपरी धावली

मुंबईकडे जाणारी व येणारी सर्व रेल्वे वाहतूक बुधवार रात्री पासून बंद असल्याने कसारा रेल्वे स्थानकात अनेक गाड्या उभ्या होत्या. त्यात अनेक प्रवासी अडकले होते. आज सकाळी अडकलेल्या प्रवासासाठी ठाणे जिल्हाधिकारी नार्वेकर यांच्या आदेशाने कसारा रेल्वे स्थानकाकडे एस टी बस पाठवण्यात आल्या. शहापूर उपविभागीय पोलीस अधिकारी नवनाथ ढवले, तहसीलदर निलिमा सूर्यवंशी, प्रभारी अधिकारी केशव नाईक, रेल्वे सुरक्षा पोलीस अधिकारी हनुमान सिंग, रेल्वे अधिकाऱ्यांनी नियोजन करित कसारा रेल्वे स्थानकात अडकलेल्या तब्बलं २५०० प्रवाशांना बसने इच्छित स्थळी सोडण्यात आले. यासाठी तब्बल ४६ बस सोडण्यात आल्या होत्या, तर ४० बस इगतपुरीत अडकलेल्या प्रवशांसाठी रवाना करण्यात आल्या.
 

 

02:52 PM

चिपळूण बस स्थानक पाण्याखाली, फोटो व्हायरल

02:47 PM

कसारा ईगतपूरी वाहतूक झाली सुरू

कसारा ईगतपूरी वाहतूक झाली सुरू. सध्या केवळ टिटवाळा कसारा रेल्वे वाहतूक बंद.

02:36 PM

कसारा: रेल्वे व महामार्ग या दोन्ही घाटात दरडी कोसळल्याने रेल्वे व महामार्ग वाहतूक विस्कळीत

बुधवारी २१ जुलै रोजी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे कसारा रेल्वे व महामार्ग घाटात महाकाय दरड कोसळल्याने मुंबई नाशिक रेल्वे मार्गासह रस्ते महामार्गांवरील वाहतूक विस्कळीत झाली. कसारा रेल्वे घाटात २ ठिकाणी रेल्वे रुळावर मोठ्या प्रमाणात दरड व मातीचा मलबा रेल्वे ट्रॅकवर आल्याने व लूप लाईनच्या रेल्वे ट्रॅक खालील माती भराव वाहून गेल्याने नाशिक कडे जाणारी वाहतूक रात्री ८ पासून बंद ठेवण्यात आली होती.

     

02:36 PM

रत्नागिरी, रायगड जिल्ह्यातील पूर परिस्थितीचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

गेल्या २४ तासांत अतिवृष्टीमुळे विशेषतः रत्नागिरी, रायगड जिल्ह्यांत निर्माण झालेल्या पूर परिस्थितीबाबत आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एका तातडीच्या बैठकीत आढावा घेतला. हवामान विभागाने पुढील तीन दिवस कोकण किनारपट्टीच्या भागात पावसाचा इशारा सांगितला असून रेड व ऑरेंज अलर्ट दिला आहे. मुख्यमंत्र्यांनी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा तसेच इतर संबंधित विभागांना सतर्क राहून बचाव कार्य करण्याचे निर्देश दिले आहेत.

02:35 PM

समुद्राला भरती अन् आभाळही फाटलं; जगबुडी, वशिष्ठीच्या रौद्ररुपानं रत्नागिरी, चिपळुणात महापूर

02:23 PM

लातूर शहरात थांबलेल्या रिक्षावर झाड कोसळले ; रिक्षाचालक ठार

लातूर शहरात गुरुवारी दुपारी उषाकिरण टॉकीज समोरील परिसरात असलेले झाड एका ऑटोरिक्षावर कोसळले. त्यात रिक्षाचालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून लातूर शहर व परिसरात रिमझिम पाऊस सुरू आहे. झाड नेमके कसे कोसळले, रिक्षात अजून कोणी होते का? आजूबाजूला नेमके काय घडले याची माहिती पोलीस घेत आहेत.

02:22 PM

खेड जगबुडी नदीवरील जुना पुल पाण्याखाली

 

02:21 PM

कोल्हापूर शहरात अनेक घरात घुसले पूराचे पाणी

कोल्हापूर शहरात गेल्या दोन दिवसापासून सुरु असलेल्या तुफान पावसामुळे रामानंदनगर, सुतारवाडा, शाहुपुरी, कुंभारगल्ली, मुक्त सैनिक वसाहत येथील अनेक घरात पुराचे पाणी शिरल्याने शहरवासियांची एकच तारांबळ उडाली. महामहापालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या पथकांसह अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ धाव घेत घरात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं.

02:15 PM

कसारा: रेल्वे व महामार्ग या दोन्ही घाटात दरडी कोसळल्याने रेल्वे व महामार्ग वाहतूक विस्कळीत

बुधवारी २१ जुलै रोजी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे कसारा रेल्वे व महामार्ग घाटात महाकाय दरड कोसळल्याने मुंबई नाशिक रेल्वे मार्गासह रस्ते महामार्गांवरील वाहतूक विस्कळीत झाली. कसारा रेल्वे घाटात २ ठिकाणी रेल्वे रुळावर मोठ्या प्रमाणात दरड व मातीचा मलबा रेल्वे ट्रॅकवर आल्याने व लूप लाईनच्या रेल्वे ट्रॅक खालील माती भराव वाहून गेल्याने नाशिक कडे जाणारी वाहतूक रात्री ८ पासून बंद ठेवण्यात आली होती.

     

01:56 PM

भरती आणि अतिमुसळधार पावसाने पुराचा फटका

डोक्यावर अतिमुसळधार पाऊस आणि त्याचवेळी आलेली भरती यामुळे पाण्याचा निचरा झाला नाही आणि रत्नागिरी जिल्ह्याला पुराचा दणका बसला. चिपळूण, खेडसह ज्या ज्या भागात खाड्या आहेत, त्या त्या भागात पुराचा मोठा फटका बसला आहे. त्याचवेळी पश्चिम महाराष्ट्रात विशेषत: सातारा जिल्ह्यात महाबळेश्वरला अतिमुसळधार पाऊस पडल्याने खेडच्या जगबुडी नदीच्या पाण्यात मोठी वाढ झाली आहे.

01:50 PM

उमरखेड, महागावला पावसाचा तडाखा

बुधवारी मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या पावसाने उमरखेड आणि महागाव तालुक्याला तडाखा दिला. दोन्ही तालुक्यातील नदी, नाले दुथडी भरून वाहात आहे. पैनगंगा नदीलाही पूर आला आहे. उमरखेड तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. कुपटी येथील एक युवक नाल्याच्या पुरात वाहून गेला हाेता. मात्र त्याला वाचविण्यात यश आले. या पावसामुळे बंदी भागातील ढाणकी, गांजेगाव, बिटरगाव, कुपटी, दहागाव आदी परिसरातील नदी, नाल्यांना पूर आला. उमरखेड ते पुसद मार्गावरील दहागावनजीक नाल्याचे पाणी पुलावरून वाहात होते. त्यात कुपटी येथील विजय दत्ता इलतकर हा युवक वाहून गेला. एका झाडाच्या आश्रयाने त्याने काही काळ तग धरला. याची माहिती प्रशासनाला मिळताच प्रशासन व नागरिकांनी त्याला सुखरूप बाहेर काढले. पावसामुळे ढाणकी ते हिमायतनगर, उमरखेड ते पुसद आदी मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. उमरखेड येथून ढाणकीकडे जाणाऱ्या रस्त्यावर पाणी साचल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प पडली होती. पैनगंगा अभयारण्य परिसरातील ४० गावांचा संपर्क तुटला आहे. 
 

 

01:48 PM

कोल्हापुरात अतिवृष्टीने उडवली दाणादाण; एनडीआरएफ पथकाला पाचारण

गुरुवारी सकाळपर्यंत झालेल्या अतिवृष्टीने जिल्ह्यातील सर्वच नद्या पात्राबाहेर पडल्या असून पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली. पंचगंगा नदीने गुरुवारी दुपारी ३९ फूट या इशारा पातळी ओलांडली आहे. ८३ बंधारे पाण्याखाली गेले असून कोल्हापूर ते रत्नागिरी, गगनबावडा, गारगोटी, गडहिग्लज, चंदगड असे प्रमुख राज्यमार्ग वाहतूकीसाठी पूर्ण बंद झाले आहेत. पूरस्थिती निर्माण होत असल्याने जिल्हा प्रशासनाने एनडीआरएफ पथकाला पाचारण केले आहे. बर्की (ता. शाहूवाडी) गावाचा संपर्क तुटला असून संध्याकाळपर्यंत संपर्क तुटलेल्या गावांची संख्या आणखी वाढणार आहे.

01:33 PM

खेड कोविड सेंटरच्या पहिल्या मजल्यापर्यंत पाणी, सर्व रुग्ण सुरक्षित

अतिमुसळधार पावसामुळे खेड शहरातील कोविड सेंटरचा तळमजला पूर्णपणे पाण्यात बुडाला आहे. या कोविड सेंटरमधील ऑक्सिजन लावलेले ३५ रुग्ण बुधवारी रात्रीच कळंबणी रुग्णालयात हलवण्यात आले असून, ऑक्सिजन न लावलेले ४५ रुग्ण दुसर्या मजल्यावर आहेत. सर्व रुग्ण सुरक्षित आहेत. खेडमध्ये जगबुडी नदीच्या जुन्या पुलावरुन पाणी जात आहे.
 

01:15 PM

महाड शहर पूर्ण जलमय

महाड बाजारपेठेत सरासरी सहा सात फुटापेक्षाही अधिक पुराची पातळी आहे. महाड नगरपरिषदेच्या मुख्यालयात पाणी शिरले. महाड नगरपरिषदेची आपत्कालीन यंत्रणा सतर्क असुन आत्तापर्यंत दोनशेहून अधिक नागरीकांचे सुरक्षीत ठिकाणी स्थलांतर करण्यात आलेले आहे. पावसाचा जोर कमी आहे मात्र महाबळेश्वर येथे मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत असल्यामुळे सावित्री नदीची पातळी वाढतच आहे.

01:13 PM

लस घेण्यासाठी निघालेली महिला पर्‍याच्या पाण्यात वाहून गेली

शहरालगत असलेल्या टेंभ्ये बौद्धवाडी येथील महिला आशा प्रदीप पवार या आडकरवाडी येथील पावाचा खाजण या पर्‍यातून जात असताना त्यांचा तोल जावून त्या पाण्यात पडून बुडून मृत्यू झाला. 

01:05 PM

सिंधुदुर्ग-पश्चिम महाराष्ट्र संपर्क तुटण्याची चिन्हे; फोंडाघाटात झाड कोसळून ठप्प

ढगफुटीसदृश्य चार दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे तळेरे कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर गगनबावडा ते कोल्हापूरदरम्यान ठिकाणी रस्ता पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक सकाळपासून बं झाली आहे. तर फोंडाघाटात झाड कोसळून वाहतूक ठप्प झाल्याने सिंधुदुर्ग पश्चिम महाराष्ट्राचा ब-याचअंशी संपर्क तुटला आहे.

01:01 PM

चिपळूण, खेड पूरपरिस्थितीत तटरक्षक दलाची मदत घेणार

भरतीची व अतिवृष्टीची वेळ एक आल्याने खेड, चिपळूणमध्ये पुराच्या पाण्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. चिपळूण नगरपालिकेने २ बोटीद्वारे रेस्क्यू ऑपरेशन चालु आहे. रत्नागिरी मधून १, पोलीस विभागाकडील १ व कोस्टगार्डची १ बोट अशा ३ बोटी रेस्क्यू ऑपरेशनसाठी पाठविणेत आल्या आहेत. पुणेहुन एनडीआरएफच्या दोन टीम (खेडसाठी १ व चिपळूणसाठी १) येथून  रेस्क्यू ऑपरेशनसाठी निघालेल्या आहेत. तटरक्षक रक्षक दलाला हेलिकॉप्टर मदतीसाठी  समन्वय करणेत येत आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

12:59 PM

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महत्वाच्या नद्यांची पातळी वाढली

सकाळी ८ वा. मोजण्यात आलेल्या नदीपातळीनुसार, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महत्वाच्या नद्यांची पाणीपातळी पुढीलप्रमाणे आहे. तिलारी नदीची पाणीपातळी तिलारीवाडी येथे ३९.४०० मीटर आहे. या नदीची इशारा पातळी ४१.६०० मीटर व धोका पातळी ४३.६०० मीटर इतकी आहे. तर कर्ली नदीची पातळी भंकसाळ नदी पुलाजवळ ५.५०० मीटर आहे. कर्ली नदीची इशारा पातळी ९.९१० मीटर आणि धोका पातळी १०.९१० मीटर इतकी आहे. खारेपाटण पुलाजवळ वाघोटन नदीची पातळी ६.३०० मीटर इतकी असून इशारापातळी ८.५०० मीटर व धोका पातळी १०.५०० मीटर असल्याची माहिती दक्षिण कोकण पाटबंधारे प्रकल्प मंडळ, सिंधुदुर्गनगरी यांनी दिली.

12:26 PM

Video : बदलापूर शहरात उल्हास नदीला पूर

12:12 PM

मुंबई-गोवा महामार्ग वाहतुकीसाठी ३ तास बंद

लांजा : तालुक्यातील काजळी व मुचकुंदी नद्यांनी रौद्ररूप धारण केले आहे. पावसाची संततधार सुरू राहिली तर मुंबई-गोवा महामार्गावरील आंजणारी व वाकेड पुलावरून पाणी जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. गुरुवारी सकाळी काजळी नदीला आलेल्या पुरामुळे अंजणारीतील ब्रिटिशकालीन पुलाला पाणी टेकले असून, मुंबई-गोवा महामार्ग ३ तास वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता.

12:09 PM

पुणे : सातत्यानं कोसळणाऱ्या पावसामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला

11:53 AM

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते बदलापूर लोकल सेवा पु्न्हा सुरळीत

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते बदलापूर लोकल सेवा पु्न्हा सुरळीत झाली आहे. रेल्वे प्रशासानानं यासंदर्भातील माहिती दिली आहे. 

11:53 AM

बदलापूर शहरात उल्हास नदीला पूर; राज्य महामार्ग आणि रेल्वे सेवा ठप्प

बदलापूर:बदलापूर शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. शहरातील बदलापूर गावाकडे जाणार उल्हास नदीवरील पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. तर बदलापूर - कर्जत रास्ता देखील पाण्याखाली आला होता. त्यामुळे हा रस्ता देखील वाहतुकीसाठी बंद करण्यात आला.बदलापूर वांगणी रेल्वे स्थानकाच्या दरम्यान रेल्वे रूळ पूर्णपणे पाण्याखाली आल्याने कर्जत आणि मुंबईकडे जाणारी रेल्वे सेवा पूर्णपणे ठप्प झाली होती.

11:51 AM

गोसीखुर्द प्रकल्पातून गुरुवारी १ वाजल्यापासून ५०० क्युसेक पाण्याचा विसर्ग होणार

भंडारा : गोसीखुर्द प्रकल्पातून गुरुवार २२ जुलै दुपारी १ वाजतापासून ५०० क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येणार. सध्या १६० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात सतत पाऊस पडत आहे. त्यामुळे धरणाची पाणी पातळी कायम राखण्यासाठी पाण्याचा विसर्ग वाढविण्यात येत आहे. वैनगंगा तीरावरील गावांना सर्कतेचा इशारा.

11:48 AM

चांदोली धरण क्षेत्रात अतिवृष्टी

पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी होऊन गेल्या २४ तासात १८५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. अतिवृष्टीमुळे चांदोली धरण पाणी पातळी झपाट्याने वाढली आहे. त्यामुळे आज दि.२२ रोजी दुपारी ३ वाजता अंदाजे २ हजार ते ४ हजार क्युसेक्स इतका पाण्याचा विसर्ग धरणातून नदी पाणी पात्रात सोडण्यात येणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा धरण प्रशासनामार्फत देण्यात आला आहे. 
 

 

11:43 AM

पालघर - वाडा तालुक्यातील शेलटे बंधारा फुटला

11:37 AM

मुसळधार पावसामुळे कल्याण बारावे कचरा प्रकल्प पाण्याखाली

11:33 AM

अकोला : खडकी परिसरात पुराचे पाणी शिरल्यामुळे नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले

11:30 AM

नांदूर मध्यमेश्वर बंधाऱ्यातून पाण्याचा विसर्ग

नदीलगतच्या गावातील नागरिकांनी खबरदारी घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

अहमदनगर: जिल्ह्याच्या काही भागात पावसाने हजेरी लावली आहे. त्याचबरोबर लगतच्या नाशिक जिल्ह्यात कालपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. आज गुरुवार दिनांक  22 जुलै रोजी सकाळी 10 वाजता नाशिक जिल्ह्यातील नांदूर माध्यमेश्वर बंधाऱ्यातून गोदावरी नदीपात्रात 6,310 क्युसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये पाऊस सुरू असल्याने नदीच्या विसर्गा मध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. नदीपात्रात मान्सून कालावधीत प्रथमच पाणी सोडण्यात आल्याने कोपरगाव, राहाता, श्रीरामपूर व नेवासा तालुक्यातील नदी लगतच्या गावातील नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

11:26 AM

उल्हासनगरातील डॉल्फिन हॉटेल व करोतीया नगर पाण्याखाली

उल्हासनगर : कॅम्प नं-३ येथील डॉल्फिन हॉटेल व करोतीयानगर मधील शेकडो घरे वालधुनी नदीचा पूर व उल्हास नदीचे  ब्लॉक पाणी वाढल्याने पाण्याखाली गेले. महापालिका आपत्कालीन विभागाचे प्रमुख बाळू नेटके यांच्या पथकाने लहान मुले, वृद्धांसह शेकडो जणांना रबरी ट्यूब व बोटीने बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.

 

11:22 AM

कोंकण रेल्वेवरील वाहतूक पुढील सूचना मिळेपर्यंत स्थगित

गेल्या काही तासांपासून सातत्यानं कोसळणाऱ्या पावसाचा परिणाम रेल्वे सेवांवरही झाला आहे. सध्या प्रवाशांच्या सुरक्षेच्या कारणास्तव कोंकण रेल्वेवरील वाहतूक पुढील सूचना मिळेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Rain Live Updates: Flood situation in many places, even rivers crossed the danger level

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app