राजस्थानहून आलेल्या उष्णतेच्या लाटांमुळे महाराष्ट्रात पुढील काही दिवस पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता. आज काही भागात पाऊस पडला आहे. सातारा, सोलापूर, रत्नागिरी आणि मुंबईतील काही भागात आज पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी पाऊस, वादळी वारा आणि गाराही पडल्या आहेत.
पंढरपुरात पावसाने जोरदार हजेरी लावली. शहरात मुसळधार पावसामुळे रस्ते जलमय झाले होते. काही भागात झाडांची पडझड झाल्याचे वृत्त आहे. पुण्यातही रात्री ९ वाजल्याच्या सुमारास विजांचा लखलखाट आणि ढगांचा गडगडाट सुरु होता. पुणे परिसरातही पावसाने हजेरी लावल्याचे वृत्त आहे.
सातारा जिल्ह्यातही कराड आणि सातारा परिसरात पावसाची रिमझिम पहायला मिळाली. मध्यरात्रीच्या सुमारास कऱ्हाड, मलकापूरसह परिसरात विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह सुमारे तासभर पावसाने हजेरी लावली होती. कराड परिसरात दुसऱ्यांदा वळवाचा पाऊस पडला आहे.
रत्नागिरीतही पावसाने हजेरी लावली, यामुळे आंबा उत्पादकांच्या अडचणीत वाढ झाली आहे. आधीच पाऊस उशिरापर्यंत थांबल्याने आंबा उत्पादकांचे मोठे नुकसान झाले आहे. दरवर्षीपेक्षा २५ टक्केच आंबा तो देखील उशिराने आला आहे. अशातच हा आंबा झाडांवर असताना पुन्हा पाऊस झाल्याने आलेले पिकही वाया जाण्याची शक्यता आहे. मुंबईतही वांद्रे परिसरात पावसाने हजेरी लावली होती.
नाशिक जिल्ह्यात ढगाळ वातावरण
जिल्ह्यातील अनेक गावांत मंगळवारी (दि.१) ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. वातावरणातील बदलांचा पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे. दरम्यान, मनमाड शहरात सोमवारी रात्री उशिरा हलक्या स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली. हवामान बदलामुळे कांदा, डाळिंब आणि इतर फळ पिकांवर रोग आणि किडींचा प्रादुर्भाव होण्याची भीती आहे. जिल्ह्यात दोन दिवस ‘यलो अलर्ट’ देण्यात आला असून काही भागात गारपिटीच्या शक्यतेने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.