नागपूर - मराठवाडा, पश्चिम विदर्भात मुसळधार पावसाने मोठा फटका बसला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात वर्धा, पैनगंगा नदीला पूर आल्याने शेतात पाणी शिरले आहे. हाताशी आलेले पिक गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे सरकारने तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
ज्वारी, कापूस, सोयाबीन पिकाचे नुकसान झाले आहे. तर पशुधनाचे नुकसान झाले आहे. अकोला, यवतमाळ ,वाशिम, बुलढाणा जिल्ह्यात पावसाने मोठा फटका बसला आहे. हजारो एकर वरील पिकाचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आल्याचे वडेट्टीवार म्हणाले. अतिवृष्टीचे गेल्यावेळेचे पैसे अजून सरकारने दिले नाही त्यात पुन्हा एकदा पावसाने शेतकऱ्यांच्या हाताचे पिक गेले आहे. एकीकडे सरकार कर्ज काढत आहे आता शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सरकारने गरज पडली तर अजून कर्ज काढावे पण त्यांना तात्काळ मदत द्यावी अशी मागणी काँग्रेस नेते वडेट्टीवार यांनी केली.
राज्यात शिवभोजन थाळी या योजनेचे गेल्या सात महिन्याचे पैसे दिलेले नाही, ही योजना सरकारला बंद करायची आहे असा आरोप वडेट्टीवार यांनी केला. गरीब जनतेसाठी असलेल्या योजना बंद होईल, पण ज्यांनी यात मेहनत केली त्यांचे पैसे का दिले जात नाही,त्यांची आत्महत्या करायची वाट सरकार बघत आहे का? असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. नागपुरात पत्रकारांशी बोलताना वडेट्टीवर म्हणाले, राज्याची तिजोरी खाली झाली आहे.निराधार योजना असो की कंत्राटदारांचे पैसे, आमदाराना निधी मिळत नाही.
देशात मतचोरी होत आहे.लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी याबाबत पुरावे दिले, यावर उत्तर देताना निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेतली. पण त्यात राजकीय भूमिका दिसली. राहुल गांधी यांनी विचारलेल्या प्रश्नांना आयोगाने उत्तर दिली नाही. महाराष्ट्रात निवडणूक झाल्यावर सीसीटीव्ही फुटेज मागितले, अनेक पत्र लिहिली पण आयोग त्याला उत्तर देत नाही उलट राहुलजी गांधी यांच्याकडे पुरावे मागत आहे, हे गजब आहे अशी टीका काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. निवडणूक आयोग आता स्वायत्त राहिला आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे. राहुलजी गांधी यांनी प्रश्न विचारले ,ते माफी मागणार नाही अस वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.