राहुरी पोटनिवडणुकीसाठी भाजपाकडून अक्षय कर्डिले यांना उमेदवारी जाहीर; वडिलांचा वारसा पुढे नेण्याचे आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2026 12:05 IST2026-04-01T12:04:52+5:302026-04-01T12:05:50+5:30
Rahuri Bypoll 2026: राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपाने अक्षय शिवाजीराव कर्डिले यांची उमेदवारी जाहीर केली आहे. आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली होती.

राहुरी पोटनिवडणुकीसाठी भाजपाकडून अक्षय कर्डिले यांना उमेदवारी जाहीर; वडिलांचा वारसा पुढे नेण्याचे आव्हान
भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने आपला उमेदवार जाहीर केला आहे. शिवाजीराव कर्डिले यांचे सुपुत्र अक्षय कर्डिले यांना पक्षाने अधिकृत उमेदवारी दिली आहे. या निर्णयामुळे राहुरीच्या राजकीय मैदानात आता युवा नेतृत्वाचा उदय पाहायला मिळणार आहे.
शिवाजीराव कर्डिले यांनी राहुरी मतदारसंघात प्रदीर्घ काळ काम केले असून, त्यांचा जनसंपर्क दांडगा होता. त्यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली होती. अक्षय कर्डिले सध्या जिल्हा बँकेचे संचालक म्हणून कार्यरत असून, त्यांना उमेदवारी देऊन भाजपाने मतदारसंघातील कर्डिले समर्थकांना मोठे बळ दिले आहे.
निवडणूक कार्यक्रम आणि लढत
निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमानुसार, राहुरी पोटनिवडणुकीसाठी २३ एप्रिल २०२६ रोजी मतदान होणार आहे. तर ४ मे रोजी निकाल लागणार आहे. या निवडणुकीत अक्षय कर्डिले यांच्यासमोर महाविकास आघाडीचे (विशेषतः प्राजक्त तनपुरे) तगडे आव्हान असण्याची शक्यता आहे. जरी ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रयत्न केले असले, तरी आता प्रत्यक्ष लढत होण्याची चिन्हे आहेत.
बारामतीमध्येही पोटनिवडणूक...
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात निधनानंतर बारामती विधानसभा मतदारसंघातही पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार ही निवडणूक लढविणार आहेत. ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे. या मतदारसंघातून शरद पवार राष्ट्रवादी उमेदवार देणार नाही.