“छगन भुजबळांनी ओबीसींचा उठाव केला त्याची गरज नव्हती”; राधाकृष्ण विखे-पाटील स्पष्टच बोलले
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2023 14:14 IST2023-11-24T14:07:11+5:302023-11-24T14:14:05+5:30
Radhakrishna Vikhe Patil Vs Chhagan Bhujbal: कुणीतरी आरक्षण मागतेय, म्हणून विरोध करायला ओबीसींचे आंदोलन उभे करायचे हे योग्य नाही, अशी टीका राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.

“छगन भुजबळांनी ओबीसींचा उठाव केला त्याची गरज नव्हती”; राधाकृष्ण विखे-पाटील स्पष्टच बोलले
Radhakrishna Vikhe Patil Vs Chhagan Bhujbal: एकीकडे मराठा आरक्षणासाठी लढा तीव्र होताना दिसत असून, दुसरीकडे ओबीसींमधून आरक्षण देण्यास मोठ्या प्रमाणावर विरोध होत आहे. यासाठी छगन भुजबळ यांनी अंबड येथे एल्गार सभा घेत मनोज जरांगे पाटील यांच्यावर घणाघाती टीका केली होती. याला मनोज जरांगे यांच्याकडून त्याच शब्दांत प्रत्युत्तर देण्यात आले असून, आरोप-प्रत्यारोपांची धार आता अधिकच वाढताना पाहायला मिळत आहे. यातच आता भाजप नेते आणि राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी छगन भुजबळ यांच्यावर टीका करताना, ओबीसींचे आंदोलन, उठाव करण्याची गरज नव्हती, असे म्हटले आहे.
मनोज जरांगे पाटील यांची मराठा आरक्षणाची जी मागणी आहे त्या मागणीला सरकारची संमती आहे. मात्र, दोन जानेवारीपर्यंत जर सरकारने मुदत घेतली असेल तर जरांगे पाटील यांनीही संयम ठेवायला हवा. छगन भुजबळ यांनी जो ओबीसींचा उठाव केला त्याची आवश्यकता नव्हती. सरकारने जर मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याची भूमिका घेतली असती, तर हा उठाव ठीक होता. पण कुणीतरी आरक्षण मागत आहे म्हणून त्यांना विरोध करण्यासाठी ओबीसींचे आंदोलन उभे करायचे हे योग्य नाही, असे राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.
संजय राऊतांच्या डोक्यावर परिणाम झालाय
राजस्थान विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रचारात सहभाग घेतला होता. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली होती. यावर बोलताना, संजय राऊत यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे, त्यांच्यावर कशाला वेळ घालवायचा, असा खोचक टोला राधाकृष्ण विखे-पाटील यांनी लगावला.
दरम्यान, दूध दराचा प्रश्न गुंतागुंतीचा आहे. दुधाची आवक प्रचंड आहे. पूर्वी दूध पावडर किंवा बटरमध्ये कन्व्हर्जन करायचे, त्याचे दर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कोसळल्याने त्याची निर्यात पूर्णपणे थांबून गेली आहे. निर्यातीला आपण प्रोत्साहन देऊ शकलो, कन्व्हर्जनला संधी मिळाली, तर भाव वाढण्यात मदत होईल. भेसळ दुधासंदर्भात कडक कारवाईच्या सूचना दिल्या आहेत, त्यामुळे दूध दर वाढीसाठी मदत होईल, असे राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सांगितले.