Radha Krishna Vikhe Patil: मनोज जरांगे यांनी गेल्या पाच दिवसांपासून सुरू केलेल्या उपोषणाला अखेर यश आले आणि सरकारने त्यांच्या मागण्या मान्य करत जीआर काढले. ५ दिवसांपासून मुंबईत ठाण मांडून बसलेल्या आणि राज्यभरात आरक्षण आंदोलनाकडे लक्ष असलेल्या मराठा बांधवांनी विजयाचा गुलाल उधळला. सरकारने काढलेले जीआर मान्य करत जरांगे यांनी आपले बेमुदत उपोषण मागे घेतले. यानंतर राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आला आहे. ओबीसी नेते नाराज असून, छगन भुजबळ यांनी मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार घातला असून, मराठा आरक्षणाबाबतच्या जीआरवरून महायुतीत मतभेद असल्याचे म्हटले जात आहे. याबाबत भाजपा नेते आणि राधाकृष्ण विखे-पाटील यांनी प्रतिक्रिया दिली.
राधाकृष्ण विखे-पाटील पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, या सगळ्या निर्णयप्रक्रियेत दररोज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी आमची चर्चा व्हायची. नव्या जीआरमुळे निर्माण होणारे कायदेशीर प्रश्न आणि पर्यायांबाबत आम्ही मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा करायचो. याबाबत सातत्याने आम्हाला त्यांचे मार्गदर्शन लाभले. सरकारने आता एक पाऊल पुढे टाकले आहे. तर हे सगळे पुढे कसे जातील, याचा विचार सगळ्यांनी केला पाहिजे. आता सर्व मराठा विचारवंतांनी अंमलबजावणीत सहकार्य करावे, असे राधाकृष्ण विखे-पाटील यांनी म्हटले आहे.
लक्ष्मण हाकेंनी इतरांच्या आरक्षणात लुडबूड करू नये
लक्ष्मण हाके अन्य लोकांच्या आरक्षणात कशाला लुडबूड करतात. ज्यांचे आरक्षण आहे त्यांना ते मिळणारच आहे. कोणीही ओबीसींचे आरक्षण काढून घेत नाही. मराठा उपसमितीला काहीच कळत नाही, असे नाही. आपल्यालाच जास्त कळते, असा अतिशहापणा लक्ष्मण हाके यांनी करू नये, असा पलटवार राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केला.
दरम्यान, राज्य सरकारकडून जो मराठा आरक्षणाचा जीआर काढण्यात आला, तो पूर्णपणे बेकायदेशीर आहे. सरकारला असा बेकायदेशीर जीआर काढण्याचा अधिकार नाही. या जीआरमुळे ओबीसी आरक्षण संपुष्टात आले आहे, असा मोठा दावा करत, ज्या बारामतीमधून मनोज जरांगे पुढे गेलेत, त्याच बारामतीत आम्ही जाऊन आंदोलन करणार. न्यायालयीन लढा आणि रस्त्यावरची लढाई लढण्यासाठी आता ओबीसी बांधवांनी एकत्र यावे, असे आवाहन ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केले.