राडा ! बीडमध्ये लग्नात फेटे बांधण्यावरून दोन गट भिडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2018 20:27 IST2018-03-13T20:27:03+5:302018-03-13T20:27:03+5:30
लग्नातील फेटे बांधण्यावरून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना गुरूवारी परळी शहरातील शिवाजीनगर भागात घडली

राडा ! बीडमध्ये लग्नात फेटे बांधण्यावरून दोन गट भिडले
बीड : लग्नातील फेटे बांधण्यावरून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना गुरूवारी परळी शहरातील शिवाजीनगर भागात घडली. याप्रकरणी परस्परांविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत. दरम्यान, एवढा गंभीर प्रकार असतानाही तपास अधिकारी असलेले हवालदार फड यांना याची कसलीच कल्पना नाही. त्यांचा अनभिज्ञपणा या प्रकरणास अप्रत्यक्षरित्या पाठबळ देत असल्याचे दिसून येत आहे.
शिवाजीनगर भागात एका लग्न समारंभ होता. यावेळी व्यापारी ओमप्रकाश शिंदे हे फेटे बांधण्यासाठी सागर बुंदिले, आकाश बुंदिले व कैलास बुंदिले यांना बोलावण्यास गेले. यावेळी त्यांच्यात वादावादी झाली. शिंदे यांना या तिघांनी मारहाण केली. याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला. तर कैलास बुंदिले यांच्या फिर्यादीवरून ओमप्रकाश शिंदेवर गुन्हा दाखल झाला आहे. लग्नाचे फेटे बांधण्यासाठी तू लवकर का आला नाही, असे म्हणून बुंदिले यांना शिंदेने दगडाने मारहाण केली. यामध्ये दोन्ही गटाचे लोक जखमी झाले असून त्यांच्यावर अंबाजोगाई येथील स्वाराती रूग्णालयात उपचार सुरू आहेत. परळीच्या संभाजीनगर पोलीस ठाण्यात या प्रकरणाची नोंद झाली आहे. तपास हवालदार फड यांच्याकडे दिला आहे.
जबाब नोंदविण्यास दिरंगाई -
दोन दिवस उलटूनही तपास अधिकारी फड यांनी जखमींचा जबाब नोंदविला नाही. आपण बाहेर असल्याचे फड यांनी सांगितले. या गुन्ह्याची मला माहिती नसल्याची कबुलीही त्यांनी दिली.