एमपीएससी उत्तीर्ण उमेदवारांच्या नियुक्तीचा प्रश्न सुटला
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2019 19:06 IST2019-09-09T19:05:35+5:302019-09-09T19:06:27+5:30
एमपीएससीतर्फे २०१७ च्या राज्यसेवा परीक्षेचा सुधारित निकाल प्रसिध्द केला आहे.

एमपीएससी उत्तीर्ण उमेदवारांच्या नियुक्तीचा प्रश्न सुटला
पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेतलेल्या राज्यसेवा परीक्षेतील उत्तीर्ण उमेदवारांच्या लांबलेल्या नियुक्तीचा प्रश्न अखेर मार्गी लागणार आहे. पुढील सात दिवसांत उपजिल्हाधिकारी, डी.वाय.एस.पी.,तहसीलदार आदी महत्त्वाच्या पदांचे नियुक्तीपत्र संबंधित पात्र उमेदवारांना दिले जाईल, असे आयोगाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे एमपीएससीतर्फे २०१७ चा मुख्य परीक्षेचा समांतर आरक्षणावरील सुधारित निकाल प्रसिध्द केला. त्यामुळे विद्यार्थ्यांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.
एमपीएससीतर्फे २०१७ मध्ये राज्य सेवेच्या सुमारे ४५० पदांची जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल जाहीर केल्यानंतर ऑक्टोबर २०१८ मध्ये पात्र उमेदवारांना प्रशिक्षणासाठी पाठविले जाणार होते. परंतु, एमपीएससीच्या निकालावर आक्षेप घेवून आरक्षित प्रवर्गाच्या महिला उमेदवारांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे आरक्षित प्रवर्गातील महिला उमेदवार खुल्या प्रवर्गातून अर्ज करू शकतात हे स्पष्ट झाले होते. त्यामुळे एमपीएससीकडून सुधारित निकाल जाहिर करणे अपेक्षित होते. मात्र, सुमारे वर्षभरापासून एमपीएससीकडून यावर निर्णय घेतला जात नव्हता. त्यामुळे पात्र उमेदवारांनी पुणे विभागीय आयुक्त कार्यालयासमोर दोन दिवसांपूर्वी आंदोलन केले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी एमपीएससीकडून सुधारित निकाल जाहीर केला. एमपीएससीतर्फे सुधारित निकाल प्रसिध्द केल्यामुळे रखडलेल्या नियुक्तीचा प्रश्नही मार्गी लागला आहे.
---
एमपीएससीतर्फे २०१७ च्या राज्यसेवा परीक्षेचा सुधारित निकाल प्रसिध्द केला आहे. त्यामुळे नियुक्तीच्या प्रतिक्षेत असलेल्या उमेदवारांना लवकरच संबंधित विभागाकडून नियुक्ती पत्र दिले जाईल. सामान्य प्रशासन विभागाकडून येत्या सात दिवसात पात्र उमेदवारांना नियुक्ती देण्याबाबत आवश्यक कार्यवाही केली जाईल.
- चंद्रशेखर ओक, अध्यक्ष, राज्य लोकसेवा आयोग