नरेंद्र मोदींच्या लाटेचा फटका मुंबई, ठाणे आणि रायगडमधील सर्व विद्यमान खासदारांना बसला. मनसे फॅक्टर प्रभावशून्य ठरवित या परिसरातील बाराही जागांवर महायुतीची मोहोर मतदारांनी उमटविली. मुंबईच्या सहा, ठाण्याच्या चार आणि रायगडमधील मावळसह दोन जागांवर महायुतीचे उमेदवार दणक्यात निवडून आले. या शहरी पट्ट्यात मोदी लाटेवर स्वार होत अनेक धक्कादायक आणि अनपेक्षित निकाल लागल्याचे दिसते. नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देत भाजपाच्या उमेदवारासमोर आपले उमेदवार उभे न करणार्या मनसेच्या राज ठाकरे यांना मात्र मोदी लाटेपासून कोणताच लाभ झाला नसल्याचे निकालातून स्पष्ट झाले आहे. मनसेचे शिवसेनेसमोरील सर्वच्या सर्व उमेदवार या निवडणुकीत गारद झाल्याने मनसे फॅक्टर या निवडणुकीत कुचकामी ठरला आहे. २00९ च्या निवडणुकीत मनसेच्या सहाही उमेदवारांनी लाखाच्या घरात मते मिळवली होती. त्यामुळे शिवसेना-भाजपा युतीचे सहाच्या सहा उमेदवार भुईसपाट होत काँग्रेसचे उमेदवार निवडून आले होते. मनसे फॅक्टर काँग्रेसच्या पथ्यावरच पडला होता. मागील निवडणुकीतील या मनसे लाटेचा या निवडणुकीत मात्र मागमूसही दिसला नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पश्चात शिवसेनेचा मुंबईकरांवरील पगडा कमी होऊन मनसेचा प्रभाव वाढेल, ही अटकळही चुकीची ठरली आहे. शिवसैनिकांनी चिकाटीने आपले उमेदवार निवडून आणत बाळासाहेबांना आपल्यापरीने श्रद्धांजलीच वाहिल्याचे पहावयास मिळत आहे. बाळासाहेबांनी गद्दार ठरवलेल्या सर्वच नेत्यांना या निवडणुुकीत पाठ टेकावी लागली आहे. गुजरातमध्ये जाऊन मोदी यांच्या विकासकामांची तारीफ करणार्या राज ठाकरे यांनी या निवडणुकीत नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. मोदींना पाठिंबा देतानाच राज ठाकरे यांनी शिवसेना उमेदवारांसमोर आपले उमेदवार उभे केले. त्यामुळे जिथे शिवसेना उमेदवार आहेत तेथील मोदीसमर्थक आपली मते मनसेच्या पारड्यात टाकतील, हा राजकीय विश्लेषकांचा होरा होता. प्रत्यक्षात तसे काहीच झाले नाही तर गेल्या निवडणुकीच्या तुलनेत मनसेची मते कमीच झाली.
मनसे फॅक्टर ठरले पंक्चर
By admin | Updated: May 17, 2014 03:47 IST