जलयुक्त शिवारसाठी ५४५ कोटींची तरतूद; कृषी सिंचनासाठी ४२५ कोटी - मुख्यमंत्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2023 12:53 IST2023-05-18T12:51:14+5:302023-05-18T12:53:05+5:30
जलयुक्त शिवार, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार या योजना प्रभावीपणे राबवाव्यात. या योजनांच्या कामांना गती देण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातून दिले.

जलयुक्त शिवारसाठी ५४५ कोटींची तरतूद; कृषी सिंचनासाठी ४२५ कोटी - मुख्यमंत्री
ठाणे : अल निनोच्या प्रभावामुळे यंदा पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी होण्याची शक्यता आहे, तसेच नेहमीपेक्षा उशिरा पावसाचे आगमन असल्यामुळे पावसाचे पाणी वाचवून ते आणि जमिनीत जिरवणे आवश्यक आहे. त्यासाठी जलयुक्त शिवार, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार या योजना प्रभावीपणे राबवाव्यात. या योजनांच्या कामांना गती देण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातून दिले. जलयुक्त शिवार योजनेसाठी ५४५ कोटी, तर प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेसाठी ४२५ कोटी निधीची तरतूद केल्याचे त्यांनी सांगितले.
जलयुक्त शिवार टप्पा २, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार या योजनांसंदर्भात बुधवारी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, जलसंधारण आणि वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी मुख्यमंत्र्यांनी ठाण्यातून दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला. राज्य उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई हे मंत्रालयातून सहभागी झाले होते.
पाणी साठवणुकीची क्षमता वाढ होणाऱ्या जागांची निवड स्थानिक लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून करावी. अभियान लोकचळवळ व्हावी, यासाठी नाम फाउंडेशन, भारतीय जैन संघटना, नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान आदींसारख्या स्वयंसेवी संस्थांची मदत घेण्याच्या सूचना शिंदे यांनी केल्या.
महाराष्ट्र देशात अग्रेसर
जलसंधारणाच्या सर्वाधिक योजना यशस्वीपणे राबविण्यात महाराष्ट्र हे देशात अग्रेसर राज्य ठरले आहे. केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्या अहवालामध्येही जलसंधारण योजना राबविण्यात महाराष्ट्राने देशात प्रथम क्रमांक नोंदविला, ही कौतुकास्पद बाब आहे. राज्यात जलयुक्त शिवार टप्पा दोन अभियानाच्या यशस्वितेसाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.