वाङ्मयचौर्य केल्याचे सिद्ध करा, लेखणी बंद करेन; ‘पानिपत’कार, साहित्यिक विश्वास पाटील यांनी दिले आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2025 16:03 IST2025-09-23T15:57:46+5:302025-09-23T16:03:02+5:30

मला कोल्हेकुईची फिकीर नाही..; ‘लोकमत’च्या व्यासपीठावरून दिले आव्हान

Prove plagiarism, I will stop writing Literary Vishwas Patil challenges | वाङ्मयचौर्य केल्याचे सिद्ध करा, लेखणी बंद करेन; ‘पानिपत’कार, साहित्यिक विश्वास पाटील यांनी दिले आव्हान

वाङ्मयचौर्य केल्याचे सिद्ध करा, लेखणी बंद करेन; ‘पानिपत’कार, साहित्यिक विश्वास पाटील यांनी दिले आव्हान

सातारा : वाङ्मयचौर्याची राळ उठवणाऱ्यांमध्ये हिंमत असेल, भारताच्या कुठल्याही चौकात किंवा सभागृहात येण्याची माझी तयारी आहे. मी दहा हजार पानांचे साहित्य लिहिले आहे. मग, एक पॅरेग्राफ जरी कुठून घेतला असेल तर ते सिद्ध करावे. मी माझी लेखणी बंद करेन,’ असे आव्हान ‘पानिपत’कार व साहित्यिक विश्वास पाटील यांनी दिले.

सातारा येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर ‘लोकमत’ कार्यालयातील संपादकीय सहकाऱ्यांशी पाटील यांनी सोमवारी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध विषयांवर मोकळेपणाने गप्पा मारल्या. संमेलनाध्यक्षपदी निवडीनंतर त्यांच्यावर एका साहित्यिक वर्तुळातून आरोप-प्रत्यारोप होत आहेत. त्याविषयी त्यांनी आपली स्पष्ट भूमिका ‘लोकमत’च्या व्यासपीठावर मांडली.

ते म्हणाले, ‘मी मोबाइलवर रील बनविण्यासाठी अभ्यास करीत नाही. मी ऐतिहासिक साहित्यावर लिहिताना त्या-त्या ठिकाणी प्रत्यक्ष गेलो. ‘संभाजी’ कादंबरी लिहिण्यासाठी सहा वर्षे सह्याद्रीमध्ये प्रत्यक्ष फिरलो. संभाजी महाराज ज्या मार्गाने गेले, त्या भागात सलग २२ तास ३५ किलोमीटर पायपीट केली. त्यावेळी मला सह्याद्रीने इतिहास शिकवला.

माझ्यावर बालिशपणाने राळ उठवणाऱ्यांनी रील करण्यापेक्षा फिरून दाखवावे. मी वाघ अन् सिंहाला भीत नाही, कारण ते समोरून वार करतात; पण उंदराला डोळे नसतात. तो कपाटात घुसून भारीतला भारी शालू कुरतडून टाकतो. त्याचप्रमाणे मी संमेलनाचा अध्यक्ष होणार, हे विरोधकांना कळाले. त्यानंतर आमच्या वारणेच्या खोऱ्यातील दोन उंदरांनी कोणत्याही पुराव्याशिवाय माझ्यावर राळ उठवण्यास सुरुवात केली, असे पाटील यांनी सांगितले.

साहित्यिकाला जात नसते..

दुसऱ्या प्रांतातील एकाला कुणबी दाखला मिळाला; पण माझ्याकडे पुरावे असताना मला मिळाला नाही, असे मी म्हणालो होतो; परंतु माझ्यावर टपलेल्या त्या उंदरांनी शिताफीने मी जातीयवादी असल्याचा कट रचला; पण साहित्यिकाला जात नसते. त्याचा माणुसकी हा एकच धर्म असतो. तो माझ्या साहित्याच्या पानापानांतून वाचकांना दिसतो, असे पाटील म्हणाले.

मला कोल्हेकुईची फिकीर नाही..

माझी अधिकारी म्हणून कारकीर्द साताऱ्यातून सुरू झाली. माझ्या कामकाजाविषयी चुकीची राळ उठवली जाते; पण आरोप असते तर मला शासनाने नोटीस दिली असती. पण, राळ उठवणाऱ्यांना बालिशपणाला मी काय उत्तर देणार, असा सवाल करीत पाटील म्हणाले, ‘माझ्या प्रशासकीय कारकिर्दीत मी साहित्य लिहिले; पण कोणत्याही रात्रीच्या पार्ट्या व क्लबला गेलो नाही. विदाऊट पे रजा घेऊन साहित्य लिहिले. मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना त्यांनी मला साहित्य लिखाणासाठी नऊ महिने रजा दिली. मी माझे प्रमोशन नाकारले. त्यामुळे मला पेन्शनही कमी मिळाली. हवे असेल, तर विरोधकांनी माहितीच्या अधिकारात ती मिळवावी, असे आव्हान पाटील यांनी केले.

Web Title: Prove plagiarism, I will stop writing Literary Vishwas Patil challenges

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.