वेश्या व्यवसाय अधिकृत, मग ग्राहकाला अटक का? 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2024 08:26 AM2024-04-15T08:26:09+5:302024-04-15T08:26:36+5:30

उच्च न्यायालयाने आमिर नियाज खान विरुद्ध महाराष्ट्र राज्य या केसमध्ये तीन वर्षांपासून जेलमध्ये असलेल्या आरोपीस जामीन दिला.

Prostitute business official, then why arrest the customer | वेश्या व्यवसाय अधिकृत, मग ग्राहकाला अटक का? 

वेश्या व्यवसाय अधिकृत, मग ग्राहकाला अटक का? 

प्रकाश सालसिंगीकर, वकील

उच्च न्यायालयाने आमिर नियाज खान विरुद्ध महाराष्ट्र राज्य या केसमध्ये तीन वर्षांपासून जेलमध्ये असलेल्या आरोपीस जामीन दिला. पोलिसांना अल्पवयीन मुलींना वेश्या व्यवसायात ढकलून कुंटणखाना चालवला जात असल्याची माहिती सामाजिक संस्थेद्वारे मिळाली. त्यावेळी त्यांनी तेथे धाड टाकून एका अज्ञान मुलीला सोडवले व तिला या व्यवसायात टाकणाऱ्या व्यक्तींसह एका ग्राहकाला सुद्धा अटक केली. या केसमधील अर्जदार हा ग्राहक म्हणून तेथे गेला हाेता, असा  आरोप त्याच्यावर होता. या सुनावणीच्या वेळी अर्जदारांच्या वकिलांनी कोलकाता उच्च न्यायालयाच्या एका केसचा दाखला देत, त्या केसमध्ये म्हणजेच सुरेश बाबू विरुद्ध पश्चिम बंगाल यामध्ये एक अनिवासी भारतीय कोलकात्याला आला असता त्याला पाठदुखी होत होती.

त्यामुळे पाठीला मसाज करण्यासाठी त्याला इंटरनेटवरून एका मसाज सेंटरची माहिती मिळाली. त्या ठिकाणी गेल्यावर त्याला एक रूम दिली गेली व तेथे असताना अचानक पोलिसांची धाड पडली व पोलिसांनी त्याला व त्याच्यासह संबंधित लोकांना इम्मोरल ट्रॅफिक ॲक्टअंतर्गत अटक केली. ती केस बलात्कार किंवा पोक्सोची नव्हती. त्यामुळे त्या केसमध्ये न्यायालयाने ग्राहकाला इम्मोरल ट्रॅफिकसाठी आरोपी म्हणता येणार नाही, असा निर्वाळा दिला. परंतु उच्च न्यायालयासमोर  नियाज खानच्या निकालामध्ये बलात्कार तसेच पोक्सोचे कलमसुद्धा समाविष्ट होते. पोक्सो कायद्यानुसार प्रिझमशन हे असल्याने ती मुलगी अज्ञान होती हे आरोपीस माहिती नव्हते, हे दाखवण्याची जबाबदारी त्याच्यावरच असेल. 

उच्च न्यायालयाच्या आदेशामध्ये मुलीचे वय किती होते? हे दिसून येत नसले तरी माननीय उच्च न्यायालयाने त्यांच्यासमोर असलेल्या सर्व परिस्थितीनुसार जामीन दिला आहे. सर्वसाधारणपणे जी मुले १८ वर्षे वयाच्या सीमेवर असतात ती १८ पेक्षा कमी आहेत की जास्त हे समजणे कठीण असते. एखादे मूल कुठल्या परिस्थितीत वाढले, हवामान, प्रदूषण, खाण्या-पिण्याच्या सवयी, ताण- तणाव अशा अनेक बाबींवरून एखाद्या मुलाचे वजन किंवा शारीरिक वाढ ही कमी जास्त प्रमाणात होत असते. त्यामुळे कधी कधी लहान वय असलेली व्यक्तीसुद्धा मोठी वाटते, तर मोठी असलेली व्यक्तीसुद्धा वयाने लहान वाटते. त्यामुळे ‘अशा’ ठिकाणी गेलेल्या ग्राहकांना ‘तिचे’ निश्चित वय कळणे शक्य नाही. त्यामुळे एखादा ग्राहक नकळतपणे अशा केसमध्ये अडकू शकतो. 

एखादी महिला वेश्याव्यवसायामध्ये कशी आली? स्वखुशीने की तिला जबरदस्तीने आणले गेले, हे विषय महत्त्वाचे असले तरी भारतात वेश्याव्यवसायाला परवानगी आहे. वेश्याव्यवसाय कायदेशीर असूनही, अनेक भारतीय असे मानतात की ते अनैतिक आणि सांस्कृतिक मूल्यांचे उल्लंघन आहे. अशा विचारामुळेच लपून छपून वेश्याव्यवसाय केला जातो त्यामुळे स्वाभाविकच स्त्रियांचे शोषण करण्यास अनेकांना संधी मिळते. 

बऱ्याचदा ग्राहकांची सुद्धा आर्थिक पिळवणूक पोलिस किंवा अन्य लोकांकडून केलेली उदाहरणे आपल्या समोर आहेत. अशा ठिकाणी गेल्याचे कळाल्यामुळे किंवा तेथे पकडले गेल्यामुळे घरच्यांना, समाजाला सदर बाब कळू नये यासाठी वाटेल की किंमत मोजण्याची तयारी बऱ्याचदा लोकांची असते. या निर्णयामुळे काहीअंशी हे प्रमाण कमी होऊ शकते व अशा ग्राहकांची पिळवणूक थांबली जाऊ शकते, असे मला वाटते.

१८ वर्षांपेक्षा कमी वय असल्याने स्वतःच्या लग्नासाठीसुद्धा संमती देऊ शकत नाही, अशा बालकांना या वेश्याव्यवसायात ढकलणे यापेक्षा मोठे पाप कोणतेही नाही. कदाचित या निर्णयाचा आधार घेऊन ज्या आरोपींना ‘ती’ व्यक्ती १८ वर्षांखालील असल्याचे माहिती होते तेसुद्धा माहिती नसल्याचा बचाव घेऊन कायद्याच्या कचाट्यातून सुटू शकतात. या व्यवसायात अज्ञान मुलींना ढकलणे हे कारस्थान तर नाही ना? लहान बालकांचा वापर करणे हा एक मानसिक आजार आहे. या आजारास पेडोफिलिया असे म्हणतात. यामध्ये लहान मुलांचा छळ करणे, त्यांना मारणे, त्रास देणे अशा कृती मानसिक आजारी व्यक्तीकडून घडत असतात. एखाद्या केसमधील ग्राहक असा मानसिक रुग्ण तर नाही ना याचा सुद्धा शोध घेतला पाहिजे. 

Web Title: Prostitute business official, then why arrest the customer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.