विवेक पाटील यांची २३४ कोटींची संपत्ती जप्त, ईडीची कारवाई; कर्नाळा बँक घोटाळा प्रकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2021 05:44 AM2021-08-18T05:44:56+5:302021-08-18T05:45:38+5:30

Karnala Bank scam case : ईडीच्या अटकेत असलेल्या विवेक पाटील यांच्यावर ६७ बनावट खात्यांच्या माध्यमातून ५६० कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. राज्यभर गाजलेल्या या प्रकरणी ईडीने नुकतेच न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे.

Property worth Rs 234 crore confiscated from Vivek Patil, action taken by ED; Karnala Bank scam case | विवेक पाटील यांची २३४ कोटींची संपत्ती जप्त, ईडीची कारवाई; कर्नाळा बँक घोटाळा प्रकरण

विवेक पाटील यांची २३४ कोटींची संपत्ती जप्त, ईडीची कारवाई; कर्नाळा बँक घोटाळा प्रकरण

googlenewsNext

मुंबई : कर्नाळा नागरी सहकारी बँकेच्या शेकडो कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मंगळवारी माजी आमदार आणि बँकेचे माजी अध्यक्ष विवेक (विवेकानंद) शंकर पाटील यांची २३४ कोटींची स्थावर मालमत्ता जप्त केली आहे. त्यात कर्नाळा क्रीडा अकादमी आणि अनेक भूखंडांचा समावेश आहे.
ईडीच्या अटकेत असलेल्या विवेक पाटील यांच्यावर ६७ बनावट खात्यांच्या माध्यमातून ५६० कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. राज्यभर गाजलेल्या या प्रकरणी ईडीने नुकतेच न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. आजच्या कारवाईमुळे पनवेल परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. चार वेळा आमदार राहिलेल्या विवेक पाटील यांना ईडीने १५ जूनला अटक केली आहे. बँकेचे अध्यक्ष व संचालकांनी रक्कम स्वतःच्या खात्यात वर्ग केल्यानंतर ईडीने याबाबत मनी लाॅंड्रिंगअंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता.
२०१९-२० मध्ये, रिझर्व्ह बँकेच्या आदेशानुसार, कर्नाळा नागरी सहकारी बँक लिमिटेड, पनवेल आणि मुंबईविरुद्ध ऑडिट करण्यात आले. या ऑडिट दरम्यान असे आढळून आले की, बँकेचे तत्कालीन चेअरमन विवेक  पाटील हे बनावट खात्याद्वारे त्या बँकेतून पैसे काढत होते आणि ते कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट आणि कर्नाळा क्रीडा अकादमीत टाकत होते. या दोन्ही संस्था पाटील यांनीच स्थापन केल्या आणि त्यांच्यावर नियंत्रण ठेवल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. कर्नाळा बँकेच्या हजारो सभासदांच्या गुंतवणुकीच्या रकमेचा अपहार केल्याप्रकरणी प्रथम पनवेल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशानंतर या प्रकरणाचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण शाखेकडे (सीआयडी) वर्ग करण्यात आला होता.
ईडीच्या तपासादरम्यान असे आढळून आले, ही फसवणूक २००८ पासून सुरू होती. ईडीच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या प्रकरणात पीएमएलए ॲक्ट अन्वये करण्यात आलेल्या तपासात ही फसवणूक ६७ बनावट खात्यांद्वारे करण्यात आली होती आणि ही फसवणूक व्याजासह सुमारे ५६० कोटी रुपयांची होत असल्याचे उजेडात आले. फसवणुकीवर पांघरूण घालण्यासाठी, पैसे वेगवेगळ्या खात्यांद्वारे पाटील यांनी स्थापन आणि नियंत्रित केलेल्या संस्थांच्या अनेक बँक खात्यांमध्ये वळवण्यात आले. कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट, कर्नाळा क्रीडा अकादमी आणि इतर वैयक्तिक फायद्यांसारख्या संस्थांच्या माध्यमातून क्रीडा संकुल, महाविद्यालय आणि शाळा यांसारख्या मालमत्ता बांधण्यासाठी या रकमेचा वापर करण्यात आला.

बेनामी खात्यांवर आर्थिक व्यवहार
- कर्नाळा नागरी सहकारी बँकेचे सहकार खात्याने आणि रिझर्व्ह बँकेने ऑडिट केले असता कोट्यवधी रुपयांची बेनामी खाती असल्याचे समोर आले.  
- यासंदर्भात पनवेलमध्ये संतप्त ठेवीदारांचे अनेक मोर्चेही निघाले होते. या गैरव्यवहार प्रकरणाची पनवेलचे भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर, उरणचे आमदार महेश बालदी यांनी सातत्याने पाठपुरवठा केला होता. 
- आरबीआयच्या स्पेशल ऑडिटमध्ये विवेक पाटील दोषी असल्याचेही म्हटले होते.

Web Title: Property worth Rs 234 crore confiscated from Vivek Patil, action taken by ED; Karnala Bank scam case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.