'सभागृहाचं कामकाज संपलं होतं, हे विधान धडधडीत खोटं'; रोहित पवारांनी कोकाटेंचे आणखी दोन व्हिडीओ केले पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2025 13:37 IST2025-07-22T13:34:24+5:302025-07-22T13:37:46+5:30

Rohit Pawar : आज कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण दिले. यानंतर आमदार रोहित पवार यांनी आणखी दोन व्हिडीओ शेअर केले.

proceedings of the House were over, this statement is blatantly false Rohit Pawar posts two more videos of Kokate | 'सभागृहाचं कामकाज संपलं होतं, हे विधान धडधडीत खोटं'; रोहित पवारांनी कोकाटेंचे आणखी दोन व्हिडीओ केले पोस्ट

'सभागृहाचं कामकाज संपलं होतं, हे विधान धडधडीत खोटं'; रोहित पवारांनी कोकाटेंचे आणखी दोन व्हिडीओ केले पोस्ट

Rohit Pawar : कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा  विधिमंडळात अधिवेशन काळात सभागृहातील मोबाईलवर ऑनलाईन गेम खेळण्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या प्रकरणावरुन आता दोन दिवसांपासून कृषीमंत्री कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी सुरू आहे. या प्रकरणी आज कोकाटे यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण दिले, यावरुन आमदार रोहित पवार यांनी आणखी दोन व्हिडीओ पोस्ट करुन राजीनाम्याची मागणी केली. 

मला रमी खेळताच येत नाही, दोषी असेन तर नागपूर अधिवेशनात राजीनामा देईन”: माणिकराव कोकाटे

आमदार रोहित पवार यांनी सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्स वर आणखी दोन व्हिडीओ पोस्ट केले आहेत. या पोस्टमध्ये म्हटले आहे की, "सभागृहाचं कामकाज संपलं होतं हे कृषिमंत्री महोदयांचं विधान धडधडीत खोटं आहे. उलट विकासाच्या मूळ प्रवाहापासून दूर असलेल्या आदिवासी बांधवांना दुधाळ जनावरं देण्याच्या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर सभागृहात चर्चा सुरु होती, पण ‘ओसाड गावच्या पाटलांना’ या चर्चेत रस नसावा… आणि मला सांगा पत्त्याची कोणती जाहिरात skip करण्यासाठी ४२ सेकंद लागतात हो?", असा सवाल आमदार रोहित पवार यांनी केला.

"विझताना दिव्याची ज्योत मोठी होते, तसंच काहीसं कोकाटे साहेबांचं झालंय.. आज राजीनामा देऊन शेतकऱ्यांवर ते उपकार करतील, असं वाटत होतं पण ‘गिरे तो भी टांग उपर’ अशी त्यांनी भूमिका घेत कोर्टात जाण्याची भाषा केली, हे दुर्दैव आहे. मंत्री महोदय स्वतःला वाचवण्यासाठी आज जेवढा खटाटोप करत आहेत त्यापेक्षा दिलेल्या पदाला न्याय देण्यासाठी केला असता तर ही वेळ आली नसती", असंही आमदार रोहित पवार म्हणाले. 

राजीनाम्याची मागणी

"विधिमंडळाची अप्रतिष्ठा होऊ नये म्हणून आवाज असलेले हे व्हिडीओ शेअर करणं मी टाळत होतो, पण मंत्री महोदयांनी कोर्टात जाण्याची भाषा केल्याने नाईलाजाने मला सत्य जनतेच्या कोर्टात आणावं लागतंय. आता चौकशी करायचीच तर कृषीमंत्री पत्ते खेळत होते की नाही याचीही चौकशी करावी आणि ही चौकशी निष्पक्ष पद्धतीने होण्यासाठी नैतिकता दाखवून कोकाटे साहेबांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा,, "महत्त्वाचं म्हणजे सत्य हे झाकणार नसल्याने राजीनामा देण्यासाठी पुढील अधिवेशनाची कशाला वाट पाहता आणि शेतकऱ्यांना सहन करायला लावता? "असंही पवार म्हणाले.

Web Title: proceedings of the House were over, this statement is blatantly false Rohit Pawar posts two more videos of Kokate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.