राज्यात ऑनलाईन सातबारा उतारे मिळण्यास अडचणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2019 13:24 IST2019-05-27T13:22:00+5:302019-05-27T13:24:50+5:30
पुण्यासह कोकणातील रायगड,रत्नागिरी आणि सिंधूदूर्ग हे चार जिल्हे वगळता सर्व जिल्ह्यांची माहिती क्लाऊड स्थलांतरित केली आहे.

राज्यात ऑनलाईन सातबारा उतारे मिळण्यास अडचणी
पुणे: महसूल विभागातर्फे ई-फेरफार प्रक्रियेंतर्गत राज्यातील नागरिकांना डिजिटल सातबारा उतारे उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाने बहुतांश जिल्ह्यांची माहिती क्लाऊडवर टाकली आहे. मात्र, दुपारी १२ ते ३ या कालावधीत डिजिटल सातबारा उतारे डाऊनलोड करण्यास काही तांत्रिक अडचणी येत होत्या. त्यातील काही अडचणी दूर झाल्या आहेत. त्यामुळे सातबारा उतारे डाऊनलोड करताना येणा-या सर्व समस्या दूर झाल्याची खात्री केल्यानंतर पुण्यासह उर्वरित चार जिल्ह्यांची माहिती क्लाऊडवर अपलोड केली जाणार आहे.
राज्य शासनातर्फे एप्रिल महिना अखेरीस राज्यातील सर्व जिल्हे क्लाऊडवर स्थलांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार पुण्यासह कोकणातील रायगड,रत्नागिरी आणि सिंधूदूर्ग हे चार जिल्हे वगळता सर्व जिल्ह्यांची माहिती क्लाऊड स्थलांतरित केली आहे. मात्र, डिजिटल सातबारा व ई-फेरफारची माहिती क्लाऊडवर स्थलांतरित केल्यानंतरही दुपारच्या वेळी सातबारा उतारे डाऊन लोड होण्यास वेळ लागत होता. त्यामुळे पुण्यासह इतर चार जिल्ह्यांची माहिती क्लाऊडवर स्थलांतरित करण्याचे काम थांबविण्यात आले होते. मात्र, पुढील आठवड्यात उर्वरित चार जिल्हे सुध्दा क्लाऊडवर स्थलांतरित होतील,असे महसूल विभागातील अधिका-यांनी सांगितले.
गेल्या दोन महिन्यात सर्व जिल्हे क्लाऊडवर स्थलांतरित झाल्यापासून नागरिकांना ४५ हजार ८०७ मोफत ‘सातबारा’,१० हजार १४९ मोफत ‘आठ अ’आणि ८ हजार ५९० मोफत फेरफार देण्यात आले आहेत. तसेच १२ लाख ८५ हजार ३७९ शुल्कासह सातबारा उतारे आणि ६ लाख ३१ हजार २८९ ‘आठ अ’ उतारे दिले गेले आहेत. मात्र, दुपारी १२ ते ३ वाजता उतारे डाऊनलोड करण्यास अडचणी येत होत्या. मात्र,आता सर्व त्रुटी दूर करण्यात आले असल्याने उतारे डाऊनलोड करण्यास वेळ लागणार नाही,असे अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे.
जानेवारी महिन्यापासून टप्प्या टप्प्याने राज्यातील सर्व जिल्हे क्लाऊडवर स्थलांतरित करण्यात आली आहेत. मात्र, तरीही नागरिकांना डिजिटल सातबारा उतारा डाऊनलोड करताना काही तांत्रिक अडचणी येत आहेत. परंतु, येत्या सोमवारपासून डिजिटल सातबारा उतारे डाऊनलोड करण्याच्या प्रक्रियेस गती मिळेल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.