खासगी बसेस आता पूर्ण क्षमतेने धावणार, गृहविभागाकडून मार्गदर्शक सूचना जारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2020 06:31 IST2020-11-07T03:41:45+5:302020-11-07T06:31:54+5:30
Private buses : कोविडच्या पार्श्वभूमीवर लागू झालेल्या नियमांची अंमलबजावणी बंधनकारक करण्यात आली आहे.

खासगी बसेस आता पूर्ण क्षमतेने धावणार, गृहविभागाकडून मार्गदर्शक सूचना जारी
मुंबई : खासगी कंत्राटी बसगाड्यांतून १० टक्के क्षमतेने पर्यटक आणि प्रवासी वाहतुकीला परवानगी देण्यात आली आहे. यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना गृहविभागाकडून जारी केल्या. मात्र, कोविडच्या पार्श्वभूमीवर लागू झालेल्या नियमांची अंमलबजावणी बंधनकारक करण्यात आली आहे. वाहन स्वच्छ आणि निर्जंतुकीकरण केलेले असावे, प्रवास करणारा पर्यटक गट बदलताना तसेच प्रवासाच्या प्रत्येक दिवशी/प्रत्येक फेरीअंती प्रवासी बसचे निर्जंतुकीकरण करावे, बसचे आरक्षण कक्ष-कार्यालय, चौकशी कक्ष यांची वेळोवेळी स्वच्छता करावी तसेच, या ठिकाणी उपस्थित कर्मचाऱ्यांनी नेहमी मास्क, सॅनिटायझरचा वापर करावा. बस जेथे उभ्या राहतात त्या ठिकाणी गर्दी होणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
ताप, सर्दी-खोकला असल्यास प्रवेश नाही
- बसमध्ये प्रवेश करणाऱ्या प्रवाशांची थर्मल-गनद्वारे तपासणी करावी.
- एखाद्या प्रवाशास ताप, सर्दी-खोकला अशा कोविड आजाराची प्राथमिक लक्षणे दिसत असल्यास त्यांना प्रतिबंध करावा.
- तसेच प्रवासादरम्यान शारीरिक अंतर ठेवण्याची दक्षता घेण्याबाबत प्रवाशांना सूचना द्याव्यात.
- सर्वांच्या नोंदी ठेवाव्यात, आदी सूचनाही देण्यात आल्या. या सर्वांच्या नाेंदी ठेवणे बंधनकारक आहे.