‘अदानीला घाबरून पंतप्रधान मोदींनी नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटलांचं नाव देणं टाळलं’, काँग्रेसचा गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 20:00 IST2025-10-07T19:59:59+5:302025-10-07T20:00:46+5:30
Navi Mumbai Airport News: नवी मुंबई विमानतळाला दिवंगत ज्येष्ट नेते दि. बा. पाटील यांचं नाव देण्याची मागणी स्थानिक जनतेकडून अनेक वर्षांपासून केली जात आहे. मात्र या मागणीवर सरकारकडून अध्यापही अधिकृतपणे कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यावरून आता काँग्रेसने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर गंभीर आरोप केला आहे.

‘अदानीला घाबरून पंतप्रधान मोदींनी नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटलांचं नाव देणं टाळलं’, काँग्रेसचा गंभीर आरोप
मुंबई - मुंबईजवळ नवी मुंबई येथे उभारण्यात आलेल्या विमानतळाचं औपचारिक उद्घाटन बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या विमानतळाला दिवंगत ज्येष्ट नेते दि. बा. पाटील यांचं नाव देण्याची मागणी स्थानिक जनतेकडून अनेक वर्षांपासून केली जात आहे. मात्र या मागणीवर सरकारकडून अध्यापही अधिकृतपणे कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यावरून आता काँग्रेसने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर गंभीर आरोप केला आहे. अदानीला घाबरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटलांचे नाव देणे टाळले, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्त्वाखाली आज पनवेल येथे महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकापर्यंत संविधान संवाद यात्रा काढण्यात आली. त्यानंतर पनवेल येथील वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह येथे आयोजित 'कामगार मेळावा आणि संविधानाचा जागर २०२५' या कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईच्या दौऱ्यावर येत असून नवी मुंबई विमानतळाचे ते उद्घाटन करणार आहेत. या विमानतळाला ज्येष्ठ नेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी केली जात आहे पण सरकारने अद्याप नाव दिले नाही. अदानीला घाबरून दि. बा. पाटील यांचे नाव देण्यास टाळाटाळ केली जात आहे. तर महाराष्ट्रावर अस्मानी संकट कोसळले असताना देशाच्या पंतप्रधानांना त्याचे काहीच सोयरसुतक नाही, नुकसानग्रस्त भागाची हवाई पाहणी तरी ते करतील काय?, असा सवाल करून केवळ श्रेय घेण्याच्या कामासाठीच पंतप्रधान पुढे येतात पण संकटातील लोकांसाठी येत नाहीत, असेही सपकाळ म्हणाले.
अतिवृष्टी व पुराने राज्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे, खरीप हंगाम तर पूर्ण वाया गेलाच आहे पण रब्बीचा हंगामही हाती लागणार नाही अशी अवस्था आहे. शेतीच्या नुकसानासोबत शेतकऱ्यांचे घर दार संसार उघड्यावर पडले आहेत परंतु भाजपा महायुती सरकारने मात्र नुकसानभरपाईच्या नावाने फसवणूक केली आहे. लाखोंचे नुकसान झाले असताना सरकारने जाहीर केलेली मदत ही अत्यंत तुटपुंजी असून उद्ध्वस्थ झालेल्या शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे, अशी टीका करून सरकारने सरसकट नुकसानग्रस्त शेतक-यांना प्रतिहेक्टरी ५० हजार रुपये मदत द्यावी व आश्वासन पाळून कर्जमाफी करावी, अशी मागणीही हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.
पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, मनोज जरांगे यांनी राहुल गांधी यांच्याबद्दल वापरलेले शब्द अयोग्य आहेत. राहुल गांधी यांनी आरक्षणाचा प्रश्न सुटावा यासाठीच जातनिहाय जनगणना व ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी अशी आग्रही मागणी केलेली आहे. काँग्रेस पक्षानेच सर्वात पहिल्यांदा मराठा समाजाला आरक्षण दिले होते. आताही सर्वच राजकीय पक्षांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा दिलेला आहे. पण निवडणुकीच्या तोंडावरच आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर येतो कसा? असा प्रश्नही सपकाळ यांनी उपस्थित केला आहे.