जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडले; भाजीपाल्यासह डाळींनी ओलांडली शंभरी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2020 06:56 AM2020-10-08T06:56:26+5:302020-10-08T07:26:09+5:30

मुंबईतील भाजीपाला मार्केटमध्ये सप्टेंबरमध्ये प्रतिदिन ५०० ते ६०० पेक्षा जास्त वाहनांमधून कृषी माल विक्रीसाठी येत होता. सद्य:स्थितीमध्ये ४०० ते ४५० वाहनांचीच आवक होत आहे.

price of vegetables and Pulses goes high due to shortage | जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडले; भाजीपाल्यासह डाळींनी ओलांडली शंभरी

जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडले; भाजीपाल्यासह डाळींनी ओलांडली शंभरी

Next

- नामदेव मोरे

नवी मुंबई : राज्यभर कोरोनाचा कहर सुरू असतानाच त्यात महाभाईची भर पडल्याने सर्वसामान्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे. भाजीपाल्यासह डाळींचा तुटवडा निर्माण झाला असून, जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडले आहेत. किरकोळ मार्केटमध्ये हिरवा वाटाणा १६० ते १८० रुपये प्रतिकिलो व शेवगा शेंगांसह फरसबी ८० ते १०० रुपये प्रतिकिलो दराने विकली जात आहे. मागणीच्या तुलनेमध्ये आवक कमी होत असल्यामुळे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.

मुंबईतील भाजीपाला मार्केटमध्ये सप्टेंबरमध्ये प्रतिदिन ५०० ते ६०० पेक्षा जास्त वाहनांमधून कृषी माल विक्रीसाठी येत होता. सद्य:स्थितीमध्ये ४०० ते ४५० वाहनांचीच आवक होत आहे. सप्टेंबरमध्ये होलसेल मार्केटमध्ये २६ ते ३६ रुपये किलो दराने विकली जाणारी फरसबी ६० ते ७० रुपयांवर गेली असून किरकोळमध्ये हे दर ८० ते १०० रुपये झाले आहेत. बीट, फ्लॉवर, शेवगा शेंग, वाटाणा, आले या सर्वांचे दर वाढले आहेत. एपीएमसीमध्ये कांद्याचे दर २८ ते ४० रुपयांवर गेले असून, किरकोळ मार्केटमधील दर ५० ते ६० रुपयांवर पोहोचले आहेत.

महागाईची तीन कारणे
राज्यात सर्वच बाजारपेठांमध्ये जीवनावश्यक वस्तूंची आवक घटली आहे.
डाळींचाही तुटवडा निर्माण झाला आहे. देशात पुरेसा साठा नाही व आयातही पुरेशा प्रमाणात होत नसल्यामुळे डाळींचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जाऊ लागले आहेत.
सप्टेंबर अखेरीस राज्यात सर्वत्र मुसळधार पाऊस झाल्याचा परिणाम उत्पादनावर झाला असल्यामुळे मागणीप्रमाणे पुरवठा होत नाही. यामुळे बाजारभाव झपाट्याने वाढू लागले आहेत.

सप्टेंबरच्या अखेरीस राज्यभर झालेल्या मुसळधार पावसाचा भाजीपाल्याच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. आवक कमी होत असल्यामुळे दर वाढू लागले असून पुढील काही दिवस मार्केटमध्ये बाजारभाव तेजीतच राहण्याची शक्यता आहे.
- शंकर पिंगळे, संचालक, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती

मुंबई बाजार समिती व किरकोळ मार्केटमधील बाजारभाव
वस्तू              ७ सप्टेंबर      ७ आॅक्टोबर    ७ आॅक्टोबर
                   (एपीएमसी)     (एपीएमसी)      (किरकोळ)
कांदा             १३ ते २३          २८ ते ४०          ५० ते ६०
वाटाणा         ९० ते ११०       १०० ते १४०       १६० ते १८०
फरसबी         २६ ते ३६         ६० ते ७०         ८० ते १००
फ्लॉवर           २० ते २४         २५ ते ३५         ८०ते १००
शेवगा शेंग      ४५ ते ५५        ५० ते ६०         ८० ते १००
बीट                १६ ते २४         २८ ते ३६         ५० ते ६०
आले               ३० ते ५०         ४५ ते ६०         ६० ते ८०
चनाडाळ        ५५ ते ६०         ५८ ते ६५        ७० ते ७५
मसूरडाळ      ६० ते ६५         ६३ ते ६८         ८० ते ९०
उडीदडाळ    ७० ते ९०          ७५ ते ९५        ९० ते १००
तूरडाळ         ८० ते ९०           ८५ ते ९५        ९० ते १२०
मूगडाळ        ९५ ते १००        ९५ ते १०५       १०० ते १२०

Web Title: price of vegetables and Pulses goes high due to shortage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.