राज्यात राष्ट्रपती राजवट लावा; मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्या - जितेंद्र आव्हाड
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2023 18:55 IST2023-10-31T18:52:18+5:302023-10-31T18:55:21+5:30
आजवर महाराष्ट्रात हे कधीच झाले नव्हते. जिथे हिंसक घटना घडत आहेत, तिथे पालकमंत्र्यांनी हजर रहावे असे अपेक्षित आहे. पण पालकमंत्री कुठेच नव्हते असा आरोप आव्हाडांनी केला.

राज्यात राष्ट्रपती राजवट लावा; मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्या - जितेंद्र आव्हाड
मुंबई – मराठा आरक्षणावरून राज्यात अस्थिरतेचे वातावरण निर्माण झाले आहे. जरांगे पाटलांनी ४० दिवसांचा अल्टिमेटम देऊनही सरकारने ठोस पाऊल उचललं नाही त्यामुळे मराठा आंदोलन पुन्हा पेटले. राज्यातील सध्याच्या परिस्थितीला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री जबाबदार असून त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा. तसेच राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.
जितेंद्र आव्हाड पुढे म्हणाले की, मराठा आरक्षणाच्या मागणीवरून राज्यातील वातावरण पुन्हा पेटले आहे. विशेषतः मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. या परिस्थितीला राज्यातील मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री जबाबदार आहेत. त्यांनी नैतिकता दाखवून आपल्या पदाचा राजीनामा द्यायला पाहिजे. तसेच राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी. एखाद्या समाजाला आश्वासन देणे आणि त्यांच्या आशा पल्लवीत करण्याचे राजकारण करणे चुकीचे आहे. मी जरांगे पाटलांचे अभिनंदन करतो की, सामाजिक स्थिरतेसाठी त्यांनी ज्या भूमिका घेतल्या त्या अभिनंदनीय आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जंरागे पाटील यांना पूर्णपणे समर्थन आहे. पण त्यांनी घोट-घोट पाणी प्यावे, अशी विनंती त्यांनी जरांगे पाटलांना केली.
तसेच राज्यात काही ठिकाणी आंदोलकांनी हिंसक वळण घेतले आहे. राज्यातील गृह विभाग तेथे पूर्णपणे निष्प्रभ ठरला आहे. हे गृह विभागाचे इंटेलिजेंसचा फेल्यूअर नाही का? आजवर महाराष्ट्रात हे कधीच झाले नव्हते. जिथे हिंसक घटना घडत आहेत, तिथे पालकमंत्र्यांनी हजर रहावे असे अपेक्षित आहे. पण पालकमंत्री कुठेच नव्हते. संचारबंदी लगेच लावायला हवी होती. पण झाले नाही. मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि पालकमंत्री यांची ती जबाबदारी होती. हिंसक वळण घेत असलेल्या ठिकाणी संचारबंदी लावण्यात उशीर का झाला? असा प्रश्नही जितेंद्र आव्हाडांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान, राज्य सरकारने त्या परिसरातील पोलीस अधीक्षकांना तात्काळ निलंबित करणे गरजेचे होते. तसेच सरकारने देखील नैतिकतेच्यादृष्टीने राजीनामा द्यायला हवा होता. दोन आमदारांची घरे जाळली जातात, त्यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री कुठे आहेत, शहरांमध्ये अशांतता असताना पालकमंत्र्यांनी त्या-त्या जिल्ह्यात हजर रहायला पाहिजेच होते. घर जाळले गेल्यानंतर तुम्ही संचारबंदी लावता. मुख्यमंत्री, गृहमंत्री तसेच पालकमंत्र्यांची जबाबदारी होती अशी टीका आव्हाडांनी केली.
८० आमदार अपात्र होणं मान खाली घालण्यासारखं
आमदार अपात्र प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री अपात्र झाल्यास त्यांना वरच्या सभागृहात घेऊ. तरीही तेच मुख्यमंत्री राहतील असे म्हटले आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस या दोन्हीही पक्षांचे मिळून ८० आमदार एकत्रित अपात्र होणार ही बाब पक्षाच्यादृष्टीने मान खाली घालण्यासारखी आहे. पुन्हा याचे पडसाद निवडणुकीत दिसणार आहेत. विद्यमान सरकारकडून गळ्याला हा गळफास आवळला जात आहे. त्यामुळे राज्यात मध्यवर्ती निवडणुका देखील लागू शकतात असा दावाही जितेंद्र आव्हाड यांनी केला.