सुपारी घेऊन मला ट्रोल करणाऱ्यांना ठोकून काढा; प्रकाश आंबेडकरांचा जाहीर आदेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2019 15:55 IST2019-03-05T15:53:36+5:302019-03-05T15:55:55+5:30
भारिपचे अध्यक्ष आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सोशल मीडियावरील ट्रोलर्सना रोखठोक इशारा दिला आहे.

सुपारी घेऊन मला ट्रोल करणाऱ्यांना ठोकून काढा; प्रकाश आंबेडकरांचा जाहीर आदेश
अकोला - भारिपचे अध्यक्ष आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सोशल मीडियावरील ट्रोलर्सना रोखठोक इशारा दिला आहे. मला ट्रोल करणाऱ्यांना ठोकून काढा. सुपारी घेऊन ट्रोलिंग करणाऱ्यांना माझे कार्यकर्तेच बघून घेतील, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.
अकोला येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आंबेडकर यांनी हा इशार दिला आहे. ते म्हणाले की, ''प्रसारमाध्यमांमधून माझ्यावर टीका करणाऱ्यांवर माझा राग नाही. मात्र राजकीय पार्श्वभूमी असलेल्यांबद्दल आता माझी हीच भूमिका असणार आहे. कुणाकडून तरी सुपारी घेऊन टीका करणाऱ्यांना ठोकून काढा. अशा लोकांना आता माझे कार्यकर्तेच बघून घेतील,'' असा इशाराच प्रकाश आंबेडकर यांनी दिला.
''आमची लढाई मोठ्या हुकूमशहाविरुद्ध आहे. त्यामुळे हुकूमशहाबरोबर लढण्यासाठी काही गोष्टी हुकूमशहासारख्या कराव्या लागतात,"असेही प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, भारतीय हवाई दलाने केलेल्या एअरस्ट्राइकचे पुरावेही देण्यात यावेत, अशी मागणीही त्यांनी केली. नेमकं काय करायचंय याचा उद्देशही स्पष्टपणे केंद्र सरकारकडे नव्हता. केवळ, आम्ही हल्ला करतो हेच दाखवायचा प्रयत्न असेल तर त्याची गरज नव्हती. कारण, यापूर्वीही ते दाखवून दिलंय, असे भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय. तसेच या एअर स्ट्राईकचे पुरावे द्या, फोटोग्राफ रिलीज करा, अशी मागणीही आंबेडकर यांनी अकोल्यातील पत्रकार परिषदेत केली.
बालाकोटमधील हवाई हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या लोकांच्या संख्येबाबत टिप्पणी करतांना हवाई दलाचे प्रमुख बी. एस. धनोआ यांच्या वक्तव्याचा दाखल आंबेडकर यांनी दिला. अशा हवाई हल्ल्यांमध्ये किती जण मृत्युमुखी पडले, याची मोजदाद भारतीय हवाई दल करीत नाही, असे विधान एअर मार्शल धनोआ यांनी केले. हे विधान म्हणजे केंद्र सरकारला जबाबदारीची जाणीव करून देणारे आहे. वायुसेनेने आपले काम केले, आता सरकारने या हल्यासंदर्भात जबाबदारीने पुरावे देण्याची गरज आहे, असे आंबेडकर यांनी म्हटलं आहे.