"प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर भाजपा…’’ नाना पटोले यांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2025 18:10 IST2025-12-18T18:06:08+5:302025-12-18T18:10:31+5:30
Nana Patole Criticize BJP: भाजपला सत्तेचा प्रचंड माज आला आहे. या पक्षाला लोकशाही मान्य नाही. अशा पक्षात जाण्यासाठी कोणते प्रलोभन मिळाले, हे तर वेळच सांगेल, परंतु ही संपूर्ण घटना अत्यंत दुर्दैवी असल्याची भावना काँग्रेस माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केली.

"प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर भाजपा…’’ नाना पटोले यांची टीका
मुंबई - प्रज्ञा सातव यांनी नेमक्या कोणत्या कारणामुळे राजीनामा दिला आणि भारतीय जनता पक्षाने त्यांना नेमके कोणते प्रलोभन दिले हे माहित नाही, मात्र भाजप कडून सातत्याने दुसऱ्या पक्षातील लोकांना फोडण्यासाठी पैशांचे व पदांचे प्रलोभन दिले जाते, हे लपून राहिलेले नाही. भाजपला सत्तेचा प्रचंड माज आला आहे. या पक्षाला लोकशाही मान्य नाही. अशा पक्षात जाण्यासाठी कोणते प्रलोभन मिळाले, हे तर वेळच सांगेल, परंतु ही संपूर्ण घटना अत्यंत दुर्दैवी असल्याची भावना काँग्रेस माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केली.
प्रसार माध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, सत्तेचा माज, सत्तेतून पैसा आणि पैशातून नेत्यांची खरेदी, हा नवा पायंडा भाजपने महाराष्ट्रात सुरू केला आहे. जनतेच्या पैशांची लूट करून आमदार विकत घेण्याचा ट्रेंड अमित शहा यांच्यापासून सुरू झाला आहे. काँग्रेसची विचारधारा कधीही संपणारी नाही. नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस संपवण्याचा कितीही प्रण घेतला असला, तरी शेवटी ‘काँग्रेसमुक्त भारत’ ऐवजी ‘काँग्रेसयुक्त भाजप’च झाली आहे. ज्या दिवशी आम्ही सत्तेत येऊ, त्या दिवशी संपूर्ण भाजपा खाली होईल. आज भाजपमध्येही पारंपरिक कार्यकर्ते आणि नेत्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे, मोठा उद्रेक सुरू आहे.
प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्यामुळे काँग्रेसचे विधान परिषदेतील संख्याबळ कमी होईल आणि विरोधी पक्षनेते पदावर याचा परिणाम होईल या पत्रकारांच्या प्रश्नावर बोलताना पटोले म्हणाले की, महायुतीला खरंतर विरोधी पक्षनेतेपद द्यायचेच नव्हते. त्यांना लोकशाही मान्य नाही. ज्यांना संविधान मान्य नाही, अशा भाजपकडून लोकशाहीची अपेक्षा तरी कशी करायची? हे अधिवेशन विरोधी पक्षनेत्याशिवायच चालवण्यात आले. जनतेचे प्रश्न मांडणे आणि त्यावर उत्तर मिळवणे ही लोकशाहीची मूलभूत रचना आहे. इंदिरा गांधी यांच्या काळात फक्त दोन खासदार असतानाही विरोधी पक्षनेतेपद देण्यात आले होते, हा इतिहास आहे आणि तो लपवता येणार नाही. लोकशाहीला दोन चाके असतात एक सत्तेचे आणि एक विरोधी पक्षाचे, ही परंपरा भाजपने मोडीत काढली आहे. संख्याबळ हा मुद्दा नाही; लोकशाहीची जाण काँग्रेसने जपली, भाजपने नाही कारण भाजपला संविधानच मान्य नाही.
काँग्रेस पक्ष चिंतन करणार का, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता नाना पटोले म्हणाले की, याबाबत पक्षांतर्गत बैठक घेऊन सखोल चिंतन करण्यात येईल. ज्या चुका झाल्या असतील, त्या दुरुस्त करण्याचा आम्ही निश्चित प्रयत्न करू.