Power supply to 3,000 flood victims | १३ हजार ६६० पूरग्रस्त ग्राहकांचा वीजपुरवठा सुरू
१३ हजार ६६० पूरग्रस्त ग्राहकांचा वीजपुरवठा सुरू

ठळक मुद्देपुरामुळे पंढरपूर, मंगळवेढा, माळशिरस, दक्षिण सोलापूर तालुक्यातील घरगुती, कृषी व वाणिज्यिक ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला होतापाणी ओसरल्यामुळे महावितरणने वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम हाती घेतले आतापर्यंत ९५ टक्के ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला

आप्पासाहेब पाटील 

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर, मंगळवेढा, माळशिरस, दक्षिण सोलापूरसह काही भागात गेल्या काही दिवसांपासून थैमान घातलेल्या महापुरामुळे खंडित झालेला किंवा संभाव्य धोका टाळण्यासाठी बंद करण्यात आलेल्या सुमारे १३ हजार ६६० ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला आहे़ पुरामुळे महावितरणचे १० कोटी रुपयांचे नुकसान झाले असून, नादुरुस्त मीटर महावितरणकडून स्वखर्चाने बदलण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

सोलापूर जिल्ह्यातील काही भागातील पूरस्थितीमुळे १३१ वीजवाहिन्यांच्या वीजपुरवठ्यावर अंशत: परिणाम झाला होता़ दरम्यान, धोका टाळण्यासाठी जिल्ह्यातील शहरी भागातील २२ व ग्रामीण भागातील १ हजार ९३६ असा १ हजार ९५८ रोहित्रांचा वीजपुरवठा तात्पुरत्या स्वरुपात बंद ठेवण्यात आला होता़ याशिवाय २१ हजार ९०० कृषीपंपधारकांचा विद्युत पुरवठाही बंद करण्यात आला होता़ अनेक ठिकाणी पुरामुळे घरात पाणी साचल्याने ग्राहकांचे वीजमीटर नादुरुस्त झाले आहेत़ ज्या भागातील पुराचे पाणी निवळले आहे त्या भागातील ग्राहकांचे वीजमीटर महावितरण स्वखचाने बदलले आहे.

पावसामुळे अनेक भागात बिकट परिस्थिती असून पावसाचे पाणी साचल्यामुळे वीजयंत्रणा मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली होती़ अशा ठिकाणी सुरक्षिततेच्या कारणास्तव वीजपुरवठा तात्पुरता बंद ठेवला होता़ या काळात महावितरणच्या वतीने अभियंते, अधिकारी व कर्मचाºयांनी अहोरात्र परिश्रम घेऊन वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले.

 पूरस्थिती ओसरल्यानंतर प्रामुख्याने सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर, मंगळवेढा, माळशिरस भागातील पूरग्रस्तांचा वीजपुरवठा सुरू करण्यात आला आहे. यात प्रामुख्याने सोलापूर जिल्ह्यातील घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक, अकृषक अशा १३ हजार ६६० वीजग्राहकांचा समावेश आहे.

सोलापूर जिल्ह्यातील १३२ ग्राहक वगळता शहरी भागात १०० टक्के वीजपुरवठा सुरू झाला आहे. तर ग्रामीण भागामध्ये सोलापूर जिल्ह्यातील ४९ अशा ग्राहकांचा वीजपुरवठा सध्या बंद आहे. हे सर्व ग्राहक अतिदुर्गम तसेच डोंगराळ भागातील असल्याने तेथील वीज यंत्रणेच्या दुरुस्तीला अडथळे येत आहेत. महापुराचा मोठा फटका बसलेल्या शहरी व ग्रामीण भागातील वीजग्राहकांचा वीजपुरवठा सुरू करण्याचे अविश्रांत प्रयत्न सुरू असल्याचेही पडळकर यांनी सांगितले.

वीजपुरवठ्याच्या कामांचा दैनंदिन आढावा...
सोलापूर जिल्ह्यातील वीजयंत्रणेच्या दुरुस्तीचे साहित्य व कुशल मनुष्यबळ पुरविण्याचे सर्व नियोजन करण्यात आले आहे. राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार हे वीजपुरवठ्याच्या कामांचा दैनंदिन आढावा घेत आहेत. पुणे प्रभारी प्रादेशिक संचालक सुनील पावडे हे गेल्या आठवडाभरापासून कोल्हापूर, सांगली व सोलापूर जिल्ह्याच्या दौºयावर आहेत.

सोलापूर मंडळाचे अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर परिमंडळाचे मुख्य अभियंता अनिल भोसले हे आवश्यक साधनसामुग्रीसह अतिरिक्त मनुष्यबळ पुरविण्याचे नियोजन तसेच इतर शासकीय यंत्रणेसोबत समन्वयासाठी कार्यरत आहेत. वीजयंत्रणेची दुरुस्ती व कार्यान्वित करण्यासाठी तांत्रिक मार्गदर्शन करीत आहेत. पुणे, बारामती व सातारा येथील पथकांसह कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील महावितरणचे अभियंते व कर्मचारी आणि कंत्राटी कुशल कर्मचारी असे सुमारे ५ हजार अभियंता व कर्मचारी वीजयंत्रणा दुरुस्ती व वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात युद्धपातळीवर कार्यरत आहेत. 

ग्रामीण भागातील ९५ टक्के वीजपुरवठा सुरळीत
- पूरग्रस्त पंढरपूर, माळशिरस, पंढरपूर, मंगळवेढा, दक्षिण सोलापूर आदी भागातील वीजपुरवठा सुरळीत करण्यात महावितरणला यश आले आहे़ घरगुती, औद्योगिक, वाणिज्यिक व कृषीपंपाचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला आहे़ नीरा व भीमा नदीत पाणी सोडल्यामुळे या नदीलगत असलेल्या शेतीचा वीजपुरवठा अद्याप सुरळीत होऊ शकला नाही़ मात्र त्यासाठी महावितरणची यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्याची माहिती अधीक्षक अभियंता पडळकर यांनी दिली़

पुरामुळे पंढरपूर, मंगळवेढा, माळशिरस, दक्षिण सोलापूर तालुक्यातील घरगुती, कृषी व वाणिज्यिक ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता़ मात्र पाणी ओसरल्यामुळे महावितरणने वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम हाती घेतले आहे़ आतापर्यंत ९५ टक्के ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला असून, उर्वरित ग्राहकांचा येत्या २४ तासात पूर्ण होईल़ महावितरण स्वखर्चाने मीटर बदलत आहे़ २०० कर्मचाºयांचे पथक आपत्ती निवारणासाठी अहोरात्र काम करीत आहे़ ग्राहकांनी महावितरणला सहकार्य करावे़
- ज्ञानदेव पडळकर,
अधीक्षक अभियंता, महावितरण, सोलापूर मंडल

अजूनही ८७ घरे बंद अवस्थेत
- पंढरपूर, मंगळवेढा, माळशिरस या पूरग्रस्त भागातील लोक घरात पाणी शिरल्यामुळे स्थलांतरित झाले होते़ स्थलांतरित झालेले लोक अद्याप परत आले नसल्यामुळे जिल्ह्यातील पूरग्रस्त भागातील ८७ घरे अद्याप बंद अवस्थेत आहेत़ त्यामुळे या घरातील वीजपुरवठा अद्याप सुरळीत करण्यात आला नसल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे़ ज्या दिवशी ते लोक आपल्या घरी येतील त्यांना २४ तासांच्या आत वीजपुरवठा करण्यात येईल, असेही महावितरणने कळविले आहे़ 

Web Title: Power supply to 3,000 flood victims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.