‘ऑपरेशन सिंदूर’विरोधात पोस्ट, केरळमधील नक्षलसमर्थक तरुणाला नागपुरातील हॉटेलमधून अटक, आरोपीकडून पत्रकार असल्याचा दावा

By योगेश पांडे | Updated: May 9, 2025 00:26 IST2025-05-09T00:25:44+5:302025-05-09T00:26:13+5:30

Nagpur Crime News: ऑपरेशन सिंदूरनंतर भारतीय सैन्याविरोधात सोशल माध्यमांवर गरळ ओकणाऱ्या नक्षलसमर्थक तरुणाला नागपुरातील हॉटेलमधून अटक करण्यात आली आहे. त्याने देशविरोधी कारवाया केल्याचा आरोप आहे. सरकारविरोधात संघर्ष पुकारण्याची त्याची तयारी होती.

Post against 'Operation Sindoor', pro-Naxal youth from Kerala arrested from a hotel in Nagpur, accused claims to be a journalist | ‘ऑपरेशन सिंदूर’विरोधात पोस्ट, केरळमधील नक्षलसमर्थक तरुणाला नागपुरातील हॉटेलमधून अटक, आरोपीकडून पत्रकार असल्याचा दावा

‘ऑपरेशन सिंदूर’विरोधात पोस्ट, केरळमधील नक्षलसमर्थक तरुणाला नागपुरातील हॉटेलमधून अटक, आरोपीकडून पत्रकार असल्याचा दावा

- योगेश पांडे  
नागपूर - ऑपरेशन सिंदूरनंतर भारतीय सैन्याविरोधात सोशल माध्यमांवर गरळ ओकणाऱ्या नक्षलसमर्थक तरुणाला नागपुरातील हॉटेलमधून अटक करण्यात आली आहे. त्याने देशविरोधी कारवाया केल्याचा आरोप आहे. सरकारविरोधात संघर्ष पुकारण्याची त्याची तयारी होती. अटकेनंतर त्याने पत्रकार असल्याचा दावा केला आहे. गुन्हे शाखेच्या पथकाने लकडगंज पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी सायंकाळी ही कारवाई केली.

रेजाझ माडेपड्डी शिबा सिदीक (वय २६ एडापल्ली, केरळ) असे आरोपी युवकाचे नाव आहे. रेजाझ हा काही दिवसांअगोदर दिल्लीत झालेल्या परिषदेत सहभागी झाला होता. ही परिषद देशात समाजविरोधी कारवाया करणाऱ्या पत्रकारांच्या सुटकेसाठी आयोजित करण्यात आली होती. तेथे त्याची काही नक्षलसमर्थक लोकांशीदेखील भेट झाली होती. तो स्वत:ला मुक्त पत्रकार व विद्यार्थी कार्यकर्ता म्हणवायचा. 'डेमोक्रॅटिक स्टुडंट्स असोसिएशन'शी संबंधित असलेला रेजाझ दिल्लीहून केरळला परतत असताना त्याच्या मैत्रिणीला भेटण्यासाठी नागपुरात आला होता. त्याची मैत्रीण ईशा हीदेखील त्याच्या कृत्यात सहभागी होती. पोलिसांना याची माहिती मिळताच लकडगंज पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका हॉटेलमधून दोघांना ताब्यात घेण्यात आले. तो 'मकतूब मीडिया' आणि 'द ऑब्झर्व्हर पोस्ट' सारख्या आउटलेटसाठी लिहितो. ज्यामध्ये जातीय भेदभाव, सांप्रदायिक हिंसाचार, राज्य दडपशाही आणि उपेक्षित समुदायांच्या हक्कांशी संबंधित कथा कव्हर करतो, असा दावा करण्यात आला आहे. लकडगंज पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी त्याच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम १४९ (भारत सरकारविरुद्ध युद्ध पुकारण्याची तयारी), १९२ (दंगल घडविण्याच्या उद्देशाने चिथावणी देणे), ३५१ (गुन्हेगारी धमकी देणे) आणि ३५३ (सार्वजनिक गैरप्रकार घडवून आणणारी विधाने) यासह इतर तरतुदींखाली गुन्हा दाखल करीत त्याला अटक केली.

पाकिस्तानच्या समर्थनार्थ केली पोस्ट
ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानमध्ये दहशतवादी तळ उद्ध्वस्त झाल्यामुळे रेजाझ संतप्त झाला होता. तो सेंट्रल अव्हेन्यूवरील अग्रसेन चौकात असलेल्या एअरगनच्या दुकानात पोहोचला. तिथे दोन बंदुकींसह फोटो काढला. त्यानंतर त्याने सोशल माध्यमांवर स्वतःचा फोटो पोस्ट केला आणि भारतीय सैन्याविरोधात लिखाण करत ते पाकिस्तानमध्ये निष्पाप लोक आणि मुलांना मारत आहेत, अशी पोस्ट लिहीली. गुप्तचर संस्था सिद्दीकीच्या हालचालींवर लक्ष ठेवून होत्या. सिद्दीकीची पोस्ट आणि फोटो पाहून ते सावध झाले व नागपूर पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली.

नक्षलवाद्यांसाठी पैसे गोळा करण्यासाठी बारकोड
आरोपीच्या सामानाची झडती घेत असताना, पोलिसांना छत्तीसगड-तेलंगणा सीमेवरील बस्तर रेंजमधील करेगुट्टा टेकडीवर सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांवर चालवलेल्या कारवाईशी संबंधित पत्रके सापडली. पत्रकांमध्ये, या कारवाईचे वर्णन आदिवासींसाठी दडपशाही करणारे असे करण्यात आले होते. प्रिस्क्रिप्शनमध्ये तीन बारकोड देखील होते. त्यांचे स्कॅनिंग केल्यानंतर, पीडितांसाठी २० ते २५ हजार रुपये देण्याचे आवाहन करण्यात आले. हे पत्रक सरकारने बंदी घातलेल्या सीपीआय (माओवादी) ने जारी केले होते. या पत्रकावरून आरोपीने नक्षलवाद्यांना आर्थिक मदत करत असल्याचे उघड झाले.

Web Title: Post against 'Operation Sindoor', pro-Naxal youth from Kerala arrested from a hotel in Nagpur, accused claims to be a journalist

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.