ठाकरे बंधूंची संभाव्य युती, एकनाथ शिंदेंची वाढली डोकेदुखी; दिल्लीत शाह-शिंदे यांच्यात खलबते
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2025 05:35 IST2025-07-11T05:34:43+5:302025-07-11T05:35:30+5:30
महापालिका निवडणुका लांबणीवर टाकण्याच्या पर्यायापासून अन्य विषयांवर उभयतांमध्ये चर्चा झाल्याचे समजते; भेटीदरम्यान निवडणूक रणनीतीवर चर्चा

ठाकरे बंधूंची संभाव्य युती, एकनाथ शिंदेंची वाढली डोकेदुखी; दिल्लीत शाह-शिंदे यांच्यात खलबते
अजित मांडके
ठाणे - मागील आठवड्यात उद्धव व राज ठाकरे यांचा वरळीत मराठीच्या मुद्द्यावर विजयी मेळावा झाला. त्यामध्ये उद्धव यांनी राजकीय युतीचे संकेत दिले. या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी सायंकाळी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीच्या महापालिका निवडणुकीवरील परिणामांबाबत चर्चा केली. भाजपनेही या संदर्भात काही खासगी संस्थांमार्फत सर्वेक्षण केले असून, त्याच्या निष्कर्षांची माहिती शाह यांनी शिंदे यांना दिली.
महापालिका निवडणुका लांबणीवर टाकण्याच्या पर्यायापासून अन्य विषयांवर उभयतांमध्ये चर्चा झाल्याचे समजते. भाजपचे लक्ष्य आता मुंबई महापालिका असून ठाकरे बंधू निवडणुकीत एकत्र आले तर त्याचे कसे परिणाम होतील, याबाबत भाजपच्या दिल्लीतील नेत्यांमध्ये चिंता आहे. भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी ठाकरे बंधूंना डिवचणारी विधाने केली. ठाकरे यांच्याविरोधात कठोर भूमिका घेतली तर काय परिणाम होतील? राज ठाकरे यांनी स्पष्टपणे उद्धव यांच्यासोबत युतीचे संकेत मेळाव्यात दिलेले नाहीत. राज यांचे मतपरिवर्तन करण्याची शक्यता किती आहे?
ठाकरे बंधूंना लक्ष्य केले तर मुंबईतील हिंदी मतदार महायुतीच्या मागे उभा राहील का? मुंबई महानगर क्षेत्रातील महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या युतीचा सामना करण्याकरिता अन्य कोणकोणत्या पक्ष, नेत्यांना सोबत घेणे शक्य आहे, अशा विविध मुद्द्यांबाबत शाह व शिंदे यांच्यात चर्चा झाली.
राज यांच्या भूमिकेची घेतली माहिती
त्रिभाषा सूत्र लागू करण्याचा निर्णय शिंदेसेनेचे शिक्षण खात्याचे मंत्री दादा भुसे यांनी रेटला. त्यांनी राज यांची भेट घेऊन मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न झाला, मात्र त्यांना अपयश आले, असेही सांगितले जाते. राज यांची भूमिका काय आहे, त्रिभाषा सूत्राला नेमका विरोध का व कुणाचा आहे, अशा बाबतीत शिंदे यांच्याकडून शाह यांनी माहिती घेतल्याचे सांगण्यात आले.
वाद टाळण्याचा दिला सल्ला
शिंदेसेनेच्या काही मंत्री, आमदार यांच्या वक्तव्यामुळे, कृतीमुळे राज्यात वादंग झाले. महापालिका निवडणुका होईपर्यंत असे वाद टाळण्याचा आदेश शाह यांनी दिला.भाजपच्या काही मंत्र्यांनी या संदर्भात दिल्लीपर्यंत तक्रारी केल्या आहेत. महायुती एकसंध असल्याचा संदेश जाणे गरजेचे आहे, असे शाह यांनी सुनावल्याचे समजते.
शिंदे गुरुवंदनेकरिता दिल्लीत : विचारे
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गुरू बदललेले आहेत म्हणून ते दिल्लीला गेल्याची टीका उद्धवसेनेचे माजी खा. राजन विचारे यांनी गुरुवारी केली. आमचे गुरू येथे ‘मातोश्री’ला बसलेले आहेत, असेही त्यांनी सांगितले. गुरुपौर्णिमेनिमित्त विचारे यांनी शक्तिस्थळावर जाऊन शिवसेनेचे दिवंगत जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या स्मृतीला अभिवादन केले.