"माजी मुख्यमंत्र्यांची मांडी खूप छोटीये"; कोकाटे म्हणाले, "शिंदेंनी फक्त कमिटमेंट पूर्ण करण्यासारखीच आश्वासनं द्यावीत"
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2025 13:44 IST2025-11-28T13:37:04+5:302025-11-28T13:44:58+5:30
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आश्वासनावर माणिकराव कोकाटे यांनी टोला लगावला आहे.

"माजी मुख्यमंत्र्यांची मांडी खूप छोटीये"; कोकाटे म्हणाले, "शिंदेंनी फक्त कमिटमेंट पूर्ण करण्यासारखीच आश्वासनं द्यावीत"
Manikrao Kokate On Eknath Shinde: नंदुरबार जिल्हा परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत महायुतीमधील घटक पक्षांमध्येच राजकीय शाब्दिक युद्ध रंगले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या एका घोषणेवरून पालकमंत्री माणिकराव कोकाटे यांनी त्यांना उपरोधात्मक टोला लगावला आहे. तळोदा नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी एकाच दिवशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या सभा झाल्या. दुपारी झालेल्या सभेत एकनाथ शिंदे यांनी तळोदा शहराच्या विकासासाठी नगरपरिषद दत्तक घेण्याची महत्त्वपूर्ण घोषणा केली. तसेच, लाडकी बहीण योजना कोणीही बंद पाडू शकणार नाही आणि बारगळ जहागीरीचा प्रश्न सोडवून तळोद्याला मुक्त करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या याच घोषणेचा संदर्भ देत माणिकराव कोकाटे यांनी तळोद्यातील सभेत त्यांची खिल्ली उडवली.
नगरपंचायत निवडणुकीसाठी सत्ताधाऱ्यांकडून विविध आश्वासन दिलं जात असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रचारादरम्यान काही ठिकाणी नगरपरिषद दत्तक घेण्याची घोषणा केली आहे. नंदुरबारमध्ये बोलताना त्यांनी तळोदा नगरपरिषद दत्तक घेण्याचे आश्वासन दिलं. त्यानंतर आता पालकमंत्री कोकाटे यांनी यावेळी एकनाथ शिंदे यांच्या राजकीय आश्वासनांवर शंका उपस्थित केली. मागील दहा वर्षांपासून नगरविकास खाते एकनाथ शिंदे यांच्याकडेच होते. असे असतानाही तळोदा नगरपरिषदेच्या विकासासाठी त्यांनी पुरेसा निधी दिला नसल्याचे कोकाटे म्हणाले.
"प्रत्येक नगरपालिकेला दत्तक घेण्याचे त्यांनी आश्वासन दिले आहे. पण त्यांना मर्यादा आहेत. आमच्या माजी मुख्यमंत्र्यांची मांडी खूप छोटी आहे. त्यांनी राजकीय विचार मांडला असेल. १० वर्षे नगरविकास मंत्री असताना त्यांनी कुठल्याही नगरपालिकेला भरीव निधी दिल्याचे दिसत नाही. तो एकनाथ शिंदे यांचा अधिकार आहे. दत्तक घ्यायचं त्यांनी घ्यावं. यावर माझं दुमत नाही. तो त्यांचा राजकीय स्टंटही असू शकतो. पण दत्तक घेण्यासाठी काही मर्यादा आहेत. गेली दहा वर्षे आपण नगरविकास खात्याचे मंत्री आहात. महाराष्ट्रात शहरांत कुठे कशी अवस्था आहे हे तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे मोकळ्या हाताने निधी दिला पाहिजे. निधी खर्च होतोय की हेसुद्धा पाहण्याची जबाबदारी नगरविकास खात्याची आहे. मी पालकमंत्री म्हणून निधी देतो तसा तेही मंत्री म्हणून निधी देतील. ज्या कमिटमेंट ते पूर्ण करु शकतील त्याच त्यांना द्याव्यात," असं माणिकराव कोकाटे म्हणाले.
"अजित पवार यांनी एकदा शब्द दिला की ते पूर्ण करतात. आम्ही राजकारण कमी आणि समाजकारण जास्त करत असतो. जो काही निधी मिळवायचा असतो तो अजित पवार यांच्या माध्यमातून मिळवतो. लाडकी बहीण योजना ही सरकारची आहे. ती कुठल्याही पक्षाची योजना नाही. त्यामुळे कुणी हरलं किंवा जिंकलं तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही," असंही आश्वासन कोकाटे यांनी दिले.