"पोलिसांनी सूर्यवंशीची हत्या केली आणि मुख्यमंत्री विधानसभेत खोटं बोलले"; राहुल गांधींचा गंभीर आरोप

By विजय पाटील | Updated: December 23, 2024 15:40 IST2024-12-23T15:37:50+5:302024-12-23T15:40:38+5:30

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोमवारी (२३ डिसेंबर) पोलीस कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी याच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यानंतर राहुल गांधींनी गंभीर आरोप केले. 

"Police killed Suryavanshi and CM lied in the assembly"; Rahul Gandhi makes serious allegations | "पोलिसांनी सूर्यवंशीची हत्या केली आणि मुख्यमंत्री विधानसभेत खोटं बोलले"; राहुल गांधींचा गंभीर आरोप

"पोलिसांनी सूर्यवंशीची हत्या केली आणि मुख्यमंत्री विधानसभेत खोटं बोलले"; राहुल गांधींचा गंभीर आरोप

Rahul Gandhi News: परभणी येथील हिंसाचारानंतर पोलीस कोठडीत असलेल्या सोमनाथ सूर्यवंशी तरुणाचा मृत्यू झाला. त्याच्या कुटुंबीयांची विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोमवारी (२३ डिसेंबर) भेट घेतली आणि सांत्वन केले.  "सोमनाथ सूर्यवंशी हा संविधानाचे रक्षण करीत होता. तो दलित असल्याने पोलिसांनी त्याची हत्या केली. याबद्दल मुख्यमंत्र्यांनी खोटे निवेदन विधानसभेत दिले", असा आरोप राहुल गांधी यांनी केला.

संविधान शिल्पाची तोडफोड झाल्यामुळे पुकारलेल्या परभणी बंददरम्यान हिंसाचार झाला. यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी या युवकाचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला. सूर्यवंशी कुटुंबियांची भेट घेण्यासाठी खासदार राहल गांधी हे परभणीत आले होते. 

यावेळी त्यांच्यासमवेत महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथल्ला, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, आ. विजय वडेट्टीवार, आ. अमित देशमुख, माजी मंत्री यशोमती ठाकूर, खा. संजय जाधव, माजी आ. सुरेश वरपूडकर, सिद्धार्थ हत्तिअंबिरे भगवान वाघमारे यांच्यासह राज्यातून आलेले अनेक नेते उपस्थित होते. गांधी यांनी तब्बल २० ते २५ मिनिटे या सूर्यवंशी कुटुंबियांशी चर्चा केली.

पोलिसांनी हत्या केली -राहुल गांधी
 
यावेळी माध्यमांशी बोलताना विरोधी पक्षनेते राहुल गांधी म्हणाले, "मी सूर्यवंशींच्या कुटुंबीयांना भेटलोय. ज्या लोकांना मारहाण झाली, त्यांनाही भेटलो. त्यांनी (सोमनाथ सूर्यवंशी यांचे कुटुंबीय) पोस्टमॉर्टम रिपोर्ट दाखविला. व्हिडीओ दाखवला. छायाचित्रे दाखविले."

"ही ९९ टक्के नाही, तर शंभर टक्के कोठडीत झालेला मृत्यू आहे. पोलिसांनी त्यांची हत्या केली आहे आणि मुख्यमंत्री पोलिसांना मेसेज देण्यासाठी विधानसभेत खोटं बोलले", असा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केला. 

दलित असल्याने हत्या -गांधी

"या तरुणाला यामुळे मारण्यात आलं, कारण तो दलित होता. आणि तो संविधानाचे तो रक्षण करीत होता. आरएसएसची विचारधारा ही संविधान नष्ट करण्याची विचारधारा आहे. याची चौकशी करावी, यात संबंधितांना शिक्षा व्हावी, अशी आमची मागणी आहे, असेही राहुल गांधी म्हणाले. 

पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर खासदार गांधी म्हणाले, "हा कोणताही राजकारण करण्याचा विषय नाही. हा न्याय मिळवून देण्याचा विषय आहे.  याला संघाची विचारधारा जबाबदार आहे. यावर मुख्यमंत्र्यांनी खोटे निवेदन दिले, त्यामुळे याला मुख्यमंत्रीही जबाबदार आहेत, असा आरोपही त्यांनी केला.

Web Title: "Police killed Suryavanshi and CM lied in the assembly"; Rahul Gandhi makes serious allegations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.