शालार्थ आयडी घोटाळ्यात पोलिसांची राज्यपातळीवरील ‘एसआयटी’ गठीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 23:32 IST2025-07-28T23:31:45+5:302025-07-28T23:32:53+5:30
राज्यातील शालेय शिक्षण विभागाच्या कार्यप्रणालीची पोलखोल करणाऱ्या शालार्थ आयडी घोटाळ्यात आता पोलीस विभागाची राज्यपातळीवरील एसआयटी गठीत करण्यात आली आहे.

शालार्थ आयडी घोटाळ्यात पोलिसांची राज्यपातळीवरील ‘एसआयटी’ गठीत
नागपूर : राज्यातील शालेय शिक्षण विभागाच्या कार्यप्रणालीची पोलखोल करणाऱ्या शालार्थ आयडी घोटाळ्यात आता पोलीस विभागाची राज्यपातळीवरील एसआयटी गठीत करण्यात आली आहे. राज्यभरातील सर्वच तक्रारींची याअंतर्गत एकत्रित चौकशी करण्यात येईल. नागपुरातील झोन-२ चे उपायुक्त व नागपुरातील घोटाळ्यातील एसआयटीचे प्रमुख नित्यानंद झा यांच्या नेतृत्वात ही राज्यपातळीवरील एसआयटी काम करेल. यासंदर्भात विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.मनोज कुमार शर्मा यांनी निर्देश जारी केले आहेत.
२०१२ मध्ये शिक्षक भरतीवर बंदी असूनही हजारो बोगस नियुक्त्या करण्यात आल्याचा गंभीर घोटाळा राज्यभर उघडकीस आला आहे. या पार्श्वभूमीवर बोगस शालार्थ आयडी प्रकरणाची चौकशी करण्यासाठी राज्यस्तरीय एसआयटी स्थापन करण्याची मागणी सातत्याने होत होती. नागपूर जिल्ह्यात २०१९ पासून ६८० बनावट शिक्षक नियुक्त्या व शालार्थ आयडी प्रकरणे समोर आली आहेत. नागपुरात दोन गुन्हे दाखल करण्यात आले असून २० हून अधिक अधिकारी-कर्मचाऱ्यांना अटकही झाली आहे.नागपूर पोलिस आयुक्तांनी एसआयटी नेमली आहे. मात्र याचा तपास नागपुरपुरताच मर्यादित आहे.
नागपुरसोबतच चाळीसगाव येथे तीन गुन्ह्यांची नोंद झाली आहे. संबंधित पोलीस ठाण्यांकडून त्याचा तपास सुरू आहे. मात्र नागपूर एसआयटीद्वारे करण्यात आलेल्या चौकशीतून शालार्थ आयडी घोटाळा व बोगस शिक्षक नियुक्ती घोटाळयाची व्याप्ती ही संपूर्ण महाराष्ट्रातील इतरत्र जिल्हयात असल्याचे दिसून आले. त्यामुळे पोलीस विभागाने सर्वच गुन्ह्यांची एकत्रित चौकशी करण्यासाठी राज्यपातळीवरील एसआयटी गठीत करण्याचा निर्णय घेतला. त्याअंतर्गत नित्यानंद झा यांच्या नेतृत्वात राज्यपातळीवर दाखल होणाऱ्या सर्व गुन्ह्यांच्या तपासासाठी एसआयटी गठीत करण्यात आली आहे. या पावलामुळे आता या घोटाळ्यातील आणखी बडे मासे पोलिसांच्या गळाला लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
मेंढेंच्या जामिनावर उच्च न्यायालयात मंगळवारी सुनावणी
दरम्यान, माजी उपसंचालक सतीश मेंढे यांनी अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये अर्ज दाखल केला आहे. त्या अर्जावर मंगळवार २९ जुलै रोजी न्यायमूर्ती उर्मिला जोशी-फलके यांच्यासमक्ष सुनावणी होणार आहे. मेंढे यांना नागपुरात चौकशीसाठी बोलविण्यात आल्याच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र त्यांना सायबर पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलविण्यात आले नव्हते, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बळीराम सुतार यांनी स्पष्ट केले.