पंढरपूर वारी २०१९ : दिंडया पताका वैष्णव नाचती..अश्व रिंगणाची त्रिभुवनात कीर्ती
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2019 19:19 IST2019-07-05T19:15:37+5:302019-07-05T19:19:44+5:30
सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास पालखीचे इंदापूरला आगमन झाले.

पंढरपूर वारी २०१९ : दिंडया पताका वैष्णव नाचती..अश्व रिंगणाची त्रिभुवनात कीर्ती
- तेजस टवलारकर-
अश्व धावले रिंगणात । टाळ मृदंगाच्या गजरात
उत्साह वाही वारकऱ्याचा । मुखी जयघोष हरिनामाचा..!
इंदापूर : तुकाराम महाराजांची पालखी सकाळी निमगाव केतकी येथून इंदापूरच्या दिशेने निघाली , वाटेत सोनाई गावात पालखीचे स्वागत करण्यात आले त्यानंतर पालखी गोकुळीचा ओढा येथें काहीवेळ विश्रांतीसाठी थांबली. वाटेतच पावसाला सुरवात झाली पावसातही वारकऱ्यांचा जल्लोष सुरूच होता.
सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास पालखीचे इंदापूरला आगमन होताच भक्तिमय व मंगलमय वातावरणात पालखीचं तिथे मोठ्या उत्साहात स्वागत झाले. पालखीचे स्वागत होताच सर्वत्र आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण तयार झाले.
सर्वप्रथम नगारखाण्याच्या गाडीची प्रदक्षिणा, डोईवर तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला, भगवा झेंडा हाती असलेले वारकरी, विणेकरी, यांच्या प्रदक्षिणा झाल्या त्यानंतर माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते अश्वाची पूजा करुन अश्वाची प्रदक्षिणा झाली.त्यानंतर तुतारी वाजली. टाळकऱ्यांनी टाळाचा गजर सुरू केला आणि अश्वाचे रिंगण सुरू झाले.दोन्ही अश्व सुसाट वेगाने धावत असताना परिसरात जल्लोष सुरू होता. पालखीला प्रदक्षिणा घालणारा अश्व देवाचा समजला जातो.
रिंगण झाल्यावर अश्वांच्या टापांखालच्या भूमीचे दर्शन घेण्यास वारकऱ्यांनी गर्दी केली, त्याची माती कपाळी वारकरी लावत होते. त्यानंतर पखवाज वादकांची जुगलबंदी टाळकऱ्याचा निनाद,फुगड्या खेळायला सुरवात झाली. लहानापासून ते ज्येष्ठांपर्यंत सगळे खेळ खेळण्यात दंग झाले होते.पादुकांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी रांगा लावल्या. हा सोहळा पाहण्यासाठी इंदापूर तालुक्यातील भाविक आले होते
आजचा मुक्काम इंदापुरला असणार आहे. शनिवारी सकाळी पालखी सोहळा सराटीच्या दिशेने मार्गस्थ होणार आहे.
..........
चिमकुल्या टाळकऱ्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले
रिंगण सोहळ्यात चिमुकले टाळकरी सहभागी झाले होते.
...............
तरुणाईचा उत्स्फूर्त सहभाग....
दरवर्षीच पालखी सोहळ्यात मोठ्या प्रमाणात तरुणाईची गर्दी उसळते. यंदाही तरुणांनी मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली
याचबरोबर एनएसएस व शालेय विद्यार्थ्यांनी स्वच्छता करत दिंडी काढली होती .
..............
इंदपूरला भरली यात्रा
इंदपूरला शुक्रवारी पालखी मुक्कामी असल्यामुळे यात्रा भरली आहे. आकाश पाळणे, खेळण्याची दुकाने लागली आहेत. तालुक्यातील लोक मोठया प्रमाणावर गर्दी केली आहे. रात्री दिंड्यातून कीर्तने व भजनाचे आयोजन करण्यात आले आहे. ज्ञानोबा माऊली तुकारामचा जयघोष सर्वत्रच एकसारखा सुरू होता. त्यामुळे भक्तिमय वातावरण झाले होते. अश्वाच्या तीन प्रदक्षिणा झाल्या. पालखीला प्रदक्षिणा घालणारावरुण राजाच्या साक्षीने अश्व धावले रिगणी