पाण्यासाठी योजना पण पैसा नाही; ५१ हजार योजनांसाठी ६१ हजार कोटींचा खर्च
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2025 08:40 IST2025-07-08T08:40:33+5:302025-07-08T08:40:33+5:30
हिंगोलीच्या विधान परिषद सदस्या डॉ. प्रज्ञा सातव यांनी रखडलेल्या कामांचा अहवाल अधिवेशनात मांडला.

पाण्यासाठी योजना पण पैसा नाही; ५१ हजार योजनांसाठी ६१ हजार कोटींचा खर्च
सोमनाथ खताळ
बीड : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘हर घर नल, हर घर जल’ हा उद्देश डोळ्यांसमोर ठेवून २०१९ पासून जलजीवन मिशन ही योजना सुरू केली. राज्यात ५१ हजार योजना मंजूर आहेत. यासाठी ६१ हजार ९३ कोटींचा खर्च येणार आहे. परंतु, पैकी २५ हजार ५४९ योजनांचेच काम पूर्ण झाले, २६ हजार योजना अद्याप अपूर्णच आहेत. केंद्राचा हिस्सा असलेल्या योजनेस ऑक्टोबर २०२४ पासून म्हणजेच नऊ महिन्यांपासून निधीच मिळाला नसल्याचे समोर आले आहे.
हिंगोलीच्या विधान परिषद सदस्या डॉ. प्रज्ञा सातव यांनी रखडलेल्या कामांचा अहवाल अधिवेशनात मांडला. त्याला राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी उत्तर देताना निधीसाठी पाठपुरावा सुरू असून, लवकरच मिळेल. उन्हाळ्यापर्यंत कामे पूर्ण होतील, असा दावा केला. त्यावर दिलेले हे उत्तर दिशाभूल करणारे असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला.
‘लोकमत’ने टाकला होता प्रकाश
राज्यातील जलजीवन मिशन योजनेच्या रखडलेल्या कामांवर ‘लोकमत’ने १०, ११ एप्रिल २०२५ रोजी प्रकाश टाकला होता. हाच मुद्दा आ. सातव व इतर आमदारांनी उपस्थित केला.
निधीसाठी केंद्राला तीन वेळा पत्र
केंद्राकडून नऊ महिन्यांपासून निधी नाही. राज्याने निधीसाठी केंद्राच्या जलशक्ती मंत्रालयास तीन वेळा पत्र पाठविले असून पाणीपुरवठा मंत्र्यांनी समक्ष भेटही घेतली आहे. परंतु, अद्याप तो निधी मिळालेला नाही.