India Israel Trade: महाराष्ट्राचे 'हे' प्रश्न इस्रायल दौऱ्यात मार्गी लागणार का? पीयूष गोयल यांच्या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2025 10:54 IST2025-11-20T10:50:43+5:302025-11-20T10:54:19+5:30
Piyush Goyal Israel Visit: केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल इस्रायल दौऱ्यावर एक मोठे शिष्टमंडळ घेऊन आले आहेत.

India Israel Trade: महाराष्ट्राचे 'हे' प्रश्न इस्रायल दौऱ्यात मार्गी लागणार का? पीयूष गोयल यांच्या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष!
अतुल कुलकर्णी
संपादक, मुंबई , लोकमत न्यूज नेटवर्क
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल इस्रायल दौऱ्यावर एक मोठे शिष्टमंडळ घेऊन आले आहेत. या दौऱ्यात इस्रायल आणि महाराष्ट्राचे काही सामायिक विषय चर्चेला येतील. त्यातून महाराष्ट्राला निश्चित फायदा होईल, अशी अपेक्षा महाराष्ट्र सरकारला आहे. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मराठवाडा वॉटर ग्रीड हा प्रकल्प प्रतिसादाच्या प्रतीक्षेत आहे.
मराठवाड्यातील सर्व धरणांना जोडणारा ३० हजार कोटींचा हा प्रकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मानला जातो. त्यासाठी इस्रायल सरकारकडून महाराष्ट्राला मदत मिळावी, अशी अपेक्षा आहे. असे झाले तर मराठवाड्याचा दुष्काळ कायमस्वरूपी संपुष्टात येईल.
इस्रायलला महाराष्ट्रातून होमवर्कर्स पाठवणार
इस्रायल आणि भारत यांच्यात इस्रायलला कुशल मनुष्यबळ देण्याविषयी काही काळापासून चर्चा सुरू आहे. महाराष्ट्र सरकारने होमवर्कर्स इस्रायलला पाठवण्याची पूर्वतयारी केली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, ८५० मुला-मुलींची निवड झालेली आहे. या विषयाला गती मिळाल्यास पुढेही मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ इस्रायल येथे पाठवता येणार आहे. सोलापूर येथे मोठे कॅन्सर हॉस्पिटल उभारण्यासाठी राज्य सरकारने नियोजन केले आहे. त्याकरता इस्रायलने मोठी गुंतवणूक करावी, अशी अपेक्षा आहे. हा देश तंत्रज्ञानाच्या बाबतीत कितीतरी पुढे आहे. मात्र त्यासोबतच तंत्रज्ञानाला गुंतवणुकीची जोड दिली तर सोलापूर येथे महाराष्ट्रातील सुसज्ज असे कॅन्सर हॉस्पिटल उभे राहू शकते, असेही महाराष्ट्रातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
भारत-इस्रायल आर्थिक संबंधांची संभाव्य क्षेत्र
मुंबईतील सागरी पाणी शुद्धीकरण प्रकल्पासाठी इस्रायलची आयडीई कंपनी तंत्रज्ञानाचा पुरवठा करणार आहे. या क्षेत्रात दोन्ही देशांमध्ये सहकार्य वाढवण्याची मोठी संधी आहे.आगामी काळात इस्रायल २०० अब्ज अमेरिकन डॉलर्स खर्चून मेट्रो, विमानतळ, बंदरे, रस्ते व गृहनिर्माण यासह मोठ्या पायाभूत सुविधा प्रकल्पांची उभारणी करणार आहे. या कामांमध्ये भारतातील बांधकाम कंपन्या आणि कामगारांसाठी संधी उपलब्ध होऊ शकते.भारत आणि इस्रायल मिळून सायबर सुरक्षा आणि संरक्षण उत्पादनातील उच्च-तंत्रज्ञान आधारित उपकरणे तयार करू शकतात. यांचा जागतिक स्तरावर, विशेषतः युरोप आणि पूर्व आशिया बाजारपेठेत संयुक्त निर्यातीसाठी मोठा वाव आहे. इस्रायलमध्ये कुशल आणि अकुशल भारतीय कामगार पाठवण्याच्या संधी वाढत आहेत. बांधकाम, पायाभूत सुविधा, शेती, देखभाल व्यवस्थापन आणि नर्सिंग/केअरगिव्हर क्षेत्रात मोठी मागणी आहे.