राज्यात १० हजार लाडक्या बहिणींना पिंक ई-रिक्षा देणार; मंत्री आदिती तटकरे यांनी दिली माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2025 15:32 IST2025-08-09T15:31:50+5:302025-08-09T15:32:59+5:30
पोलिस ठाणे आवारातील समुपदेशन केंद्रातील सदस्यांच्या मानधनवाढीचाही विचार करू

राज्यात १० हजार लाडक्या बहिणींना पिंक ई-रिक्षा देणार; मंत्री आदिती तटकरे यांनी दिली माहिती
कोल्हापूर : महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनविणाऱ्या पिंक रिक्षांमुळे या क्षेत्रातही आम्ही कमी नाही हे महिला दाखवून देतील. महिलांच्या सुरक्षिततेसाठी रिक्षात जीपीएस सिस्टीमसह बसलेल्या व्यक्तीचे छायाचित्र काढण्याची व्यवस्था आहे. रक्षाबंधनानिमित्त ही महिलांना विशेष भेट असून, पहिल्या वर्षात राज्यात १० हजार रिक्षा वाटप करणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी शुक्रवारी दिली.
कोल्हापूर येथील महासैनिक दरबार हॉल येथे महिलांना पिंक ई-रिक्षा व रूपे कार्ड वितरणप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी पालकमंत्री प्रकाश आबिटकर अध्यक्षस्थानी होते. यावेळी खासदार शाहू छत्रपती, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, महिला व बालविकास विभागाच्या आयुक्त नयना गुंडे, माजी आमदार राजेश पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन उपस्थित होते.
मंत्री तटकरे म्हणाल्या, लाडकी बहीण आणि पिंक ई-रिक्षा या योजनांच्या माध्यमातून महिलांना आर्थिक सक्षम करण्यात येत आहे. विमानतळ, पर्यटनस्थळे अशा ठिकाणी पिंक ई-रिक्षांचा वापर व्हावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून ३२ हजारांवर महिला जोडल्या गेल्या असून, त्यांचे कर्ज परफेडीचे प्रमाण ९९.९९ टक्के आहे. पोलिस ठाणे आवारातील समुपदेशन केंद्रातील सदस्यांच्या मानधनवाढीचाही विचार करू.