बीड बंद! संतोष देशमुख हत्येच्या फोटोनं संताप; १७ मार्चपर्यंत 'मनाई हुकूम जारी', सरकारचा आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 09:06 IST2025-03-04T09:05:14+5:302025-03-04T09:06:01+5:30

Beed Bandh: अपर जिल्हादंडाधिकारी शिवकुमार स्वामी ३ ते १७ मार्च या कालावधीसाठी बीडमध्ये मनाई हुकूम जारी केला आहे. त्यात संतप्त लोकांनी आज बीड जिल्हा बंदची हाक दिली आहे. 

Photos of Beed Santosh Deshmukh murder case go viral, Beed bandh today, angry people, prohibitory order issued in the district | बीड बंद! संतोष देशमुख हत्येच्या फोटोनं संताप; १७ मार्चपर्यंत 'मनाई हुकूम जारी', सरकारचा आदेश

बीड बंद! संतोष देशमुख हत्येच्या फोटोनं संताप; १७ मार्चपर्यंत 'मनाई हुकूम जारी', सरकारचा आदेश

Beed Bandh:  मराठा-ओबीसी आरक्षण वाद, संतोष देशमुख हत्याकांड यामुळे गेल्या काही महिन्यापासून बीड चर्चेत आलं आहे. बीडमधील गुन्हेगारी, राजकीय मोर्चे आणि त्यात २ समाजात असलेला तणाव पाहता जिल्ह्यात कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडू शकते. त्यातच ३ तारखेला संतोष देशमुख हत्याकांडाचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत. त्यातून संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून बीडमध्ये अपर जिल्हादंडाधिकारी यांनी मनाई हुकूम जारी केला आहे.

जिल्ह्यात मराठा, ओबीसी, धनगर समाजाच्या वतीने आरक्षण मागणी आंदोलने सुरू आहेत. केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्येतील आरोपींना कठोर शासन व्हावे यासाठी आंदोलन सुरू आहे. यासह इतर बाबींमुळे अचानक घडणाऱ्या घटनांवरून तणाव निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी शिवकुमार स्वामी ३ ते १७ मार्च या कालावधीसाठी बीडमध्ये मनाई हुकूम जारी केला आहे. त्यात संतप्त लोकांनी आज बीड जिल्हा बंदची हाक दिली आहे. 

'या' सर्व गोष्टींवर असणार बंदी

  • महाराष्ट्र पोलीस कायदा ३७(१)(३) अन्वये काढणाऱ्या आलेल्या प्रतिबंधात्मक आदेशामध्ये मोर्चे, निदर्शने, आंदोलन, धरणे आंदोलन यासारख्या ५ किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तीचा समावेश असलेल्या कोणत्याही जमावास परवानगीशिवाय एकत्र येण्यास निर्बंध राहील.
  • शस्त्रे, सोटे, काठी, तलवार, बंदूक जवळ बाळगता येणार नाहीत. काठ्या लाठ्या शारीरिक इजा होण्यास कारणीभूत ठरतील, सहज हाताळता येतील अशा वस्तू जवळ ठेवता येणार नाहीत. 
  • कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटके जवळ बाळगता येणार नाहीत. दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे फोडायची किंवा फेकायची उपकरणे साधे गोळा करून ठेवता येणार नाहीत, ते बाळगता किंवा तयारही करता येणार नाहीत. 
  • आवेशी भाषणे, अंगविक्षेपण, विडंबानात्मक नकला करता येणार नाहीत. सभ्यता, नीतिमत्ता यास बाधा येईल किंवा ज्यामुळे राज्याची सुरक्षा धोक्यात येईल किंवा अराजकता माजेल अशी चित्रे, निशाणी, घोषणा फलक किंवा इतर कोणत्याही वस्तू जवळ ठेवता येणार नाहीत. 
  • जाहीरपणे घोषणा करणे, गाणी म्हणणं, वाद्य वाजवणे, कोणतीही कृती जे देशाच्या संविधानातील मूल्यांच्या विरूद्ध असेल किंवा देशाचा मान, सार्वभौमत्व यांना इजा पोहचवणारी असेल तर ते कृत्य करता येणार नाही.
  • सार्वजनिक सुरक्षा, सामाजिक सलोख्याला हानी पोहोचवणारी, जाहीरपणे प्रक्षोभक भाषण व असभ्य वर्तन करता येणार नाही. व्यक्तींच्या किंवा शवाच्या किंवा त्यांच्या प्रतिमा याचे प्रदर्शन करणार नाहीत. 
  • ५ किंवा पाच पेक्षा अधिक व्यक्तींचा समावेश असलेल्या जमावास परवानगीशिवाय एकत्र येता येणार नाही किंवा मिरवणूक, मोर्चा काढता येणार नाही. 

 

दरम्यान, संतोष देशमुख यांच्या हत्येनंतरचे फोटो समाजमाध्यमात मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यामुळे प्रशासनाने ही खबरदारी घेतली आहे. दुसरीकडे राज्यात धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी होऊ लागली आहे. धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा यासाठी सरकारवर दबाव वाढला आहे. रात्री उशिरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात धनंजय मुंडे यांच्याबाबत चर्चा झाली आहे. धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा असं मुख्यमंत्र्‍यांनी सांगितल्याचे वृत्तही माध्यमांमध्ये झळकलं आहे. 

Web Title: Photos of Beed Santosh Deshmukh murder case go viral, Beed bandh today, angry people, prohibitory order issued in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.