पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2025 07:34 IST2025-12-14T07:30:02+5:302025-12-14T07:34:07+5:30
प्रश्नोत्तराच्या तासात आमदार नितीन राऊत यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता.

पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
नागपूर : पीएचडी करणाऱ्या महाज्योतीच्या विद्यार्थ्यांची १२६ कोटी आणि सारथी संस्थेच्या विद्यार्थ्यांची १९५ कोटी रुपये शिष्यवृत्तीची थकबाकी असल्याचे मान्य करत नियोजन विभागाकडून यासाठी पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्ती थांबली असल्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी शनिवारी विधानसभेत सांगितले.
उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे बघत शिरसाट म्हणाले की, सुदैवाने सभागृहात अजित पवार आहेत, मागील अनेक दिवसांपासून आम्ही थकीत रकमेसाठी मागणी करत आहोत, अर्थखात्याने ही रक्कम त्वरित वितरित केली तर आम्हाला शिष्यवृत्तीची रक्कम देणे सोपे होईल.
प्रश्नोत्तराच्या तासात आमदार नितीन राऊत यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळण्यात अनेक अडचणी आहेत. मागील तीन वर्षात शिष्यवृत्ती मिळत नसल्याने विद्यार्थ्यांनी शुक्रवारी विधानभवनावर मोर्चाही काढला होता, असे राऊत यांनी सांगितले.
विद्यार्थी संख्येवर नियंत्रण आणणार
अजित पवार म्हणाले की, शिष्यवृत्तीसाठी कोणतेही मोघम विषय निवडले जातात. पीएचडीसाठी शासनाकडून महिना ४२ हजार रुपये मिळतात म्हणून काही ठिकाणी एकाच कुटुंबातील पाच-पाच लोक पीएचडी करायला लागले आहेत. त्यामुळे ठराविक विद्यार्थ्यांवर कोट्यवधी रुपये खर्च होतो. याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाली असून पीएचडीसाठी निकष ठरवून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येवर नियंत्रण घालणार आहे. विद्यार्थी जे विषय निवडतात ते किती उपयुक्त आहेत हेही तपासले जाणार असून मेरिटनुसारच शिष्यवृत्ती दिली जाईल.
बार्टी, सारथी आणि महाज्योती विद्यार्थ्यांना पीएचडीसाठी शिष्यवृत्ती मंजूर करण्यासाठी निकष ठरवणार आहोत त्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे.
शिष्यवृत्ती न मिळाल्याने विद्यार्थी अभ्यास करू शकले नाहीत, त्यामुळे अशा विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा कालावधी वाढवला जाईल, असे शिरसाट यांनी सांगितले.
बार्टी संस्थेकडून २०२१ पासून २,१८५ विद्यार्थ्यांना ३२६ कोटी रुपयांची शिष्यवृत्ती दिली गेली.
२,७७९ विद्यार्थ्यांना २३६ कोटी रुपयांची शिष्यवृत्ती दिली असून १२६ कोटी रुपये थकबाकी आहे.
सारथी संस्थेत २,५८१ विद्यार्थ्यांवर ३२७ कोटी रुपये खर्च, थकबाकी १९५ कोटी आहे.